उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांसह महसूलच्या
8 अधिकारी-कर्मचार्यांवर बीडमध्ये गुन्हा दाखल
बीड । वार्ताहर
वक्फ बोर्डाच्या सुमारे 409 एकर क्षेत्र खालसा करुन खासगी लोकांना विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये समोर आला आहे. 3 मार्च 2018 ते 29 डिसेंबर 2021 या दरम्यान हा सारा फसवणूकीचा प्रकार घडला. आता याप्रकरणत तत्कालीन उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांसह महसूलच्या 8 अधिकारी-कर्मचार्यांसह 15 जणांवर शिवाजीनगर ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला. यामुळे पुन्हा एकदा जमिनी बळकावण्याच्या हा प्रकार पुढे आला आहे.
बुधवारी या संदर्भात जिल्हा वक्फ अधिकारी अमीनजुमा खलीखुजमा यांनी शिवाजीनगर ठाण्यात फिर्याद नोंदवली.त्यानुसार, वक्फ बोर्डाची जिल्ह्यात 796 एकर जमीन आहे, त्यापैकी 409 एकर 5 गुंठे जमीन सेवा बनावट कागदपत्रे तयार करुन खासगी लोकांच्या नावे करण्यात आली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. दर्गा हजरत शहशाहवली दर्गाची सेवा इनाम जमीन सर्वे नं.22 व 95 मधील काही जमीन राष्ट्रीय महामार्ग क्र.211 साठी शासनाने संपादीत केलेली आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणात या जमिनीचा सुमारे 15 कोटी रुपये मावेजा आला होता. तो हडप करण्यासाठी महसूल अधिकार्यांना हाताशी धरुन शासनाची वक्फ बोर्डाची फसवणूक करण्यात आली. तसेच तत्कालीन भूसुधार उपजिल्हाधिकारी प्रकाश अघाव यानीही हबीबोद्दीन यांच्याशी संगणमत केले. खोट्या मुतखब क्र.4744 आधारे दर्गाची इतर इनामी जमीन सर्वे. नं. 23,31,32,88 व 89 मधून दर्गाच्या नावाची नोंद कमी केली. तिथे हबीबोद्दीन व इतरांच्या नावांची बेकायदेशीर नोंदी घेतल्या. तसेच त्याचा फेरफार मंजुर करुन घेतला,त्याबाबत महसूल सचिवांनी जिल्हाधिकारी बीड यांना संबंधितावर कायदेशीर कारवाईचे आदेशही दिलेले आहेत. दरम्यान हबीबोद्दीन याने सर्वे नं.22 व 95 मधील अंदाजे 10 एकर जमीन खासगी लोकांच्या नावे केली. त्यानंतर ही जमिन चौघांनी 1 कोटी 30 लाख रुपयांत बेकायदेशीररित्या संगणमताने खरेदी केली. नंतर इतरांनी याच जमिनीमध्ये प्लॉट पाडून ते इतरांना अवैधरित्या विक्री केले. यासाठी लाचखोरी व मनी लाँड्रींग झाल्याचा दावाही तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणात हबीबोद्दीन सरदारोद्दीन सिध्दीकी (रा.सिडको एन 12 प्लॉट क्र. 14, औरंगाबाद), रशीदोद्दीन सरदारोद्दीन सिध्दीकी, कलीमोद्दीन सरदारोद्दीन सिध्दीकी (दोघे रा.शिवाजीनगर, बीड), अशफाक गौस शेख (रा.राजीवनगर, बीड), अजमतुल्ला रजाउल्ला सय्यद (रा.झमझम कॉलनी, बीड), अजीज उस्मान कुरेशी (रा.मोमीनपुरा,बीड),मुजाहिद मुजीब शेख (रा.बीड मामला, मोमीनपुरा, बीड),तत्कालीन उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील, महसूल सहायक खोड, महसूल सहायक मंडलिक (पूर्ण नावे नाहीत), तत्कालीन मंडळाधिकारी पी.के.राख, तत्कालीन तलाठी हिंदोळे (पूर्ण नाव नाही), सध्याचे तलाठी पी.एस. आंधळे, तत्कालीन तहसीलदार व इतर अधिकारी यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.आरोपींच्या अटकेनंतर अनेक बाबी समोर येणार असून या गुन्ह्याची व्याप्तीही वाढणार आहे.
Leave a comment