राष्ट्रीय लोकन्यालयात वाद मिटल्याने चिमुकल्याला मिळाले माता-पित्याचे प्रेम
बीड । वार्ताहर
पती पत्नीमधील वाद कोर्टाच्या पायरीपर्यंत जाऊन पोहाचला की त्यांच्यामध्ये समेट घडवून आणने कठीण होऊन जाते. वाद पती पत्नीचा असतो. दोघांचे पटत नाही म्हणून दोघे एकमेकांपासून विभक्त राहतात परंतु याचे परिणाम मात्र त्यांच्या लहान मुलांना विनाकारण भोगावे लागतात. अशावेळी पती-पत्नी समजदार असतील तर विकोपाला गेलेला वाददेखील सामंजस्याने मिटविता येतो. अशाच प्रकारचा एक अत्यंत विकोपाला गेलेला वाद कौंटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधिश सानिका जोशी यांनी बीड येथे दि.25 सप्टेंबर रोजी आयोजित राष्ट्रीय लोकन्यायालयासमोर समझोता करण्यासाठी पाठविला. या लोकन्यायालयाचे पॅनल प्रमुख न्या.आर.एस.पाटील व पॅनल वरील सदस्यांनी त्यामध्ये यशस्वीपणे तडजोड घउवुन आणली आणि पती पत्नीची दुभंगलेली मने पुन्हा एकदा जुळवली. यामुळे त्यांचा चार वर्षाचा मुलगा शुभम यालाही आई-वडिलांचे प्रेम मिळाले.
संतोष व मोनाली यांचा विवाह सन 2016 मध्ये बीड येथे झाला. त्यांच्या विवाहबंधनातुन एक पुत्ररत्न झाले. त्यानंतर त्यांच्यामध्ये वाद होऊ लागले. दोघांचे वाद अत्यंत विकोपाला गेले. दि.3 एप्रिल 2018 पासून मोनाली ही तिच्या माहेरी आई-वडिलांकडे राहू लागली. दोघांनाही एकमेकासोबत रहायचे नाही असे ठरवून आपसात संमतने न्यायालयातून घटस्फोट घेण्याचे ठरविले. सन 2020 मध्ये दोघांनी संमतीने घटस्फोट घेण्यासाठी बीड येथील न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. नेमलेल्या तारखेवर पती-पत्नी हजर राहील नाही म्हणून पतीने सदरचा अर्ज मागे घेतला.त्यानंतर पत्नीने बीड येथिल कौटुंबिक न्यायालयामध्ये हिंदु विवाह कायद्याप्रमाणे क्रुर वागणूक देऊन घरातुन हाकलून दिल्याच्या कारणावरुन घटस्फोट मिळण्यासाठी पतीच्या विरुध्द अर्ज केला. सदर प्रकरणामध्ये सुनावणी झाली असती व पत्नीचा सदर अर्ज न्यायालयाने मंजूर केला असता तर त्यांच्यामध्ये फारकत झाली असती. पती-पत्नी दोघेही एकमेकांपासून कायमचे विभक्त झाले असते. चार वर्षाचा शुभमला आपल्या वडिलांचा सहवास व प्रेम मिळाले नसते.परंतू कौंटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधिश श्रीमती सानिका जोशी यांनी त्यांचा संसार पुन्हा जुळावा या अत्यंत चागल्या हेतुन त्यांचे प्रकरण लोकन्यायालयाकडे पाठविले. लोकन्यायालयासमोर त्यांच्यामध्ये समझोता झाला. मोनाली पुन्हा संतोषकडे नांदायला जाण्यास तयार झाली. संतोषने देखील मोनालीला आपल्य घरी घेऊन जाण्यास तयार झाला. दोघेही एकविचाराने राहतील असे दोघांनाही लोकन्यायालयाच्या पॅनलला सांगितले.
दाम्पत्याला गुलाब पुष्प देवून
न्या.महाजन म्हणाले नांदा सौख्यभरे
याप्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश हेमंत महाजन यांनी स्वत:पॅनलच्या ठिकाणी येऊन दोघांना गुलाब पुष्प देऊन दोघांचे अभिनंदन केले. तसेच पुढील सुखी संसारासाठी दोघांना शुभेच्छा दिल्या. अशा प्रकारे पती पत्नीमध्ये दुभंगलेली मने पुन्हा जुळली आणि दुभंगलेला संसार पुन्हा जुळला दोघानिही लोकन्यायालयाच्या पॅनलचे आभार मानले.
Leave a comment