बीड :-पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी एकात्म मानव दर्शनाच्या माध्यमातून संपूर्ण जगाला मानव कल्याणाचा संदेश दिला. 'मी नाही आम्ही' हा विचार त्यांनी सतत मांडण्याचा प्रयत्न केला. पंडितजींचे जीवन कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन स्वा. सावरकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर यांनी केले.
येथील दीनदयाळ शोध संस्थान व जन शिक्षण संस्थान यांच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. सीमा जोशी या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून ऍड. अनिल तिडके यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर म्हणाले की अतिशय संघर्षमय परिस्थितीत दीनदयाळ त्यांनी शिक्षण पुर्ण केले, अगदी बालवयापासून त्यांच्या जीवनामध्ये संकटांची मालिकाच होती, परंतु आपल्या ध्येयापासून ते कधीही विचलित झाले नाहीत. महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सान्निध्यात आले, पुढे दीर्घकाळ जनसंघाचे महामंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. या काळात भारतभर भ्रमण करून त्यांनी देशातील व्यक्तीच्या प्रत्येक व्यक्तीच्या विकासासाठी 'एकात्म मानवतावाद' हा विचार मांडला. त्यानंतर 'अंत्योदय' च्या माध्यमातून रांगेतील शेवटच्या माणसाचा विचार केला पाहिजे आणि त्याला केंद्रबिंदू मानून विकास झाला पाहिजे अशी मांडणी केली. 'हाताला काम आणि शेताला पाणी' हा त्यांचा नारा होता. अध्यक्षीय समारोपात डॉ. सीमा जोशी म्हणाल्या की दीनदयाळ त्यांचे कार्य प्रेरणादायी असून दीनदयाळ शोध संस्थान मार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रम आणि प्रशिक्षणाची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी सौ. सीमा मनुरकर यांनी केले, सूत्रसंचालन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सौ. स्वाती जैन यांनी केले. आभार सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सुदाम पालकर यांनी मानले. यावेळी सौ स्नेहल केवडकर यांनी वैयक्तिक पद्य सादर केले. कार्यक्रमाला जनशिक्षण संस्थान चे संचालक गंगाधर देशमुख, डॉ. अनिल बारकुल, रवींद्र देशमुख, प्रा. एस एन कुलकर्णी, हेमंत आडगावकर, नरेंद्र जवळेकर, लक्ष्मण बहिरवाल, अनिताताई वझुरकर,सौ. रेखा ताई पिंगळे, जयश्री ताई नेलवाडकर, सौ. मनीषा कुलकर्णी, तसेच शिक्षण संस्थांच्या प्रशिक्षक, प्रशिक्षणार्थी आणि दीनदयाळ शोध संस्थांचे कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
Leave a comment