आरोप-प्रत्यारोपांना जनताही वैतागली;विकासाच्या घोषणा कागदावरच



बीड । वार्ताहर



कोरोनाची दिड वर्ष सरत आली. यावर्षी गणेशभक्तांनी लाडक्या बाप्पांचे केवळ राज्यातच नव्हे तर राज्याच्या बाहेर सर्व निर्बर्ंध झुगारुन स्वागत केले. गेल्या दहा दिवसांपासून विराजमान असलेला बाप्पा आज निरोप घेत आहे. हे बाप्पा, राज्यात जे चाललयं ते कुठं तरी थांबव. रोज कुणीतरी उठतयं आणि आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडतयं. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात दररोजच कुठल्या न् कुठल्या कारणावरुन संघर्षांची ठिणगी पडत आहे. पुन्हा दोघेही कुठल्या तरी कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येतात. केवळ आरोप-प्रत्यारोपातच आघाडी सरकारचे दोन वर्ष गेली आहेत. जाताना राज्यकर्त्यांना बुध्दी तरी देवून जा. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्यातील विवेक कुठेतरी जागा करं. सत्ताधारी मंडळीकडून घोषणांचा पाऊस पडत आहे. विकासाच्या घोषणा केवळ कागदावरच आहेत. कोरोना संकटात होरपळून निघालेल्या जनतेला आधार देण्याऐवजी केवळ दिखावा करुन दिवस पुढे ढकलण्याचे काम सरकारमधील मंत्र्यांकडून सुरु आहे. याला आता जनताही वैतागली आहे. राजकीय मंडळींच्या विरोधात सध्या सोशल मीडियावरील पोस्ट वाचल्यानंतर तरुणाईदेखील या राजकारण्यांना किती वैतागली आहे हेही स्पष्ट होत आहे. 

राज्यामध्ये सातत्याने नवे-नवे प्रश्न निर्माण होत आहेत. शेतकर्‍यांचे प्रश्न कायम आहेत. शाळा सुरु नसल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांचे प्रश्न निर्माण झाले आहेत. ऑनलाईन शिक्षणाचा सर्वत्र फज्जा उडाला आहे. निवृत्तीधारकांना त्यांचे वेतन वेळेत मिळत नाही. शासकीय सेवेत असणार्‍या कर्मचार्‍यांनाही वेतन आणि फरकाची रक्कम मिळेलच याची शाश्वती राहिलेली नाही. केवळ राजकीय मंडळीच आनंदात असल्याचे चित्र महाराष्ट्रात आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असल्याने तीन पक्ष विरुध्द एकटा भाजप असे चित्र निर्माण झाल्याने केवळ पातळी सोडून आरोप करणे, एवढेच काम सर्वांना राहिले आहे. एक महिन्यापूर्वी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाने होत्याचे नव्हते केले. महिनाभरानंतर त्यांना मदतीचा आकडा आता जाहीर झाला आहे. 30 हजार कोटींचे नुकसान झाले अन् सरकारने 3 हजार कोटी जाहीर केले. मराठवाड्यातही वेगळी परिस्थिती नाही. अनेक जिल्ह्यामध्ये शेतकर्‍यांना गतवर्षीचा पीकविमाच मिळाला नाही. कोरोना संकटात गोरगरिबांना पोटभर खायला मिळावे म्हणून केंद्राने अन्नधान्याचा मोठा साठा राज्याला दिला, परंतु हे अन्नधान्य कुठे गेले? हे कळालेच नाही. राज्यातील एकाही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीने गोरगरिबांना अन्नधान्य मिळावे यासाठी प्रयत्न केल्याचे ऐकले गेले नाही. केवळ आपले राजकारण अबाधित राहण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्नाची पराकाष्टा करत आहेत. 

नव्याने विधानसभेत पोहचलेले आमदार काहीतरी करतील अशी अपेक्षा त्या-त्या मतदार संघातील जनतेने व्यक्त केली होती, मात्र स्वत:च्या झोळ्या भरुन घेण्यात जुने आणि नवे दोघेही व्यस्त आहेत. जेष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे सरकारची सुत्रे असली तरी त्यांचेही नियंत्रण फारसे सरकावर राहिले नसल्याचे चित्र अलीकडे दिसून येत आहे. त्यांनी स्वत:च मुंबई येथील एका कार्यक्रमात राजकीय मंडळीचा दर्जा घसरल्याचे दु:ख व्यक्त केले. कोथळा बाहेर काढण्याची भाषा आता राजकारणात होवू लागली आहे, सुसंवाद संपला अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. राजकारणाचा दर्जा केव्हाच घसरला आहे, परस्परांविरोधी आरोप-प्रत्यारोप राजकारणात केले जातात, ते नवे नाहीत परंतु बुध्दी गहाण ठेवल्यासारखे राजकीय मंडळी वागू लागल्याने जनतेचे प्रश्न काय सुटणार, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे हे बुध्दीदेवता गणराया आज तू आमचा निरोप घेत आहेत, जाताना या राजकीय मंडळींना थोडीशी बुध्दी तरी देवून जा अशाच भावना गणेशभक्त असलेल्या जनतेमधून सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.