अंत्यविधीला मोकळ्या जागेत 20 लोकांची परवानगी देणार्‍यांनी

60 बाय 60 च्या जागेत 2000 लोकांचा प्रशासकीय कार्यक्रम घेतला

माजलगाव । उमेश जेथलिया

माजलगाव पंचायत समितीच्या नूतन इमारत लोकार्पणाचा जंगी कार्यक्रम शुक्रवारी (दि.17) दुपारी 3 वाजता पालकमंत्री धनंजय मुंडे, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार,आ प्रकाश सोळंके,जि.प.अध्यक्षा शिवकन्या सिरसाट आदी मान्यवरांच्या उपस्थितीत केवळ 60 बाय 60 च्या व्हरांड्यात कोव्हिडं नियमांची ऐसी की तैसी करत संपन्न झाला. हेच ते मान्यवर आहेत ज्यांनी कोव्हिडचे नियम बनवून ग्रामीण भागातील जनतेचे जगणं मुस्किल केले आहे. मोकळ्या रानात नदीकाठी होणार्‍या अंत्यविधीला केवळ 20 व्यक्तीची परवानगी देणार्‍या या मान्यवरांच्या समोर केवळ 60 बाय 60 च्या जागेत सुमारे 2000 लोकांची उपस्थिती होती. मात्र कोणी सुद्धा याबद्दल ब्र शब्द काढला नाही.
शुक्रवारी माजलगाव पंचायत समितीच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा होता.समोर जि.प.शाळेचे भव्य प्रांगण असतानाही हजारो लोकांचे जीव धोक्यात घालून पंचायत समिती सभापती सौ. सोनाली खुळे यांनी केवळ 200 व्यक्ती बसतील एव्हड्या लहान व्हरांड्यात 2000 लोकांना बसवून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी समोर बसलेल्या व्यक्तीत 3 फुटाचे सोडून 3 बोटांचे देखील अंतर नव्हते.80 टक्के पेक्षा जास्त लोकांच्या तोंडाला मास्क नव्हते. व्यासपीठावर अग्रस्थानी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार हे बसलेले होते. विशेष म्हणजे ते कार्यक्रम सुरू होण्याच्या 2 तास अगोदर गटविकास अधिकारी कक्षात बसून होते; मात्र त्यांनी याबद्दल सभापती व पंचायत समितीच्या प्रशासनास कसल्याही सूचना केल्या नाही, उलट सर्व काही अलबेल असल्याचा अविर्भाव त्यांच्या चेहर्‍यावर होता.या लोकार्पण सोहळ्यातील गर्दीमुळे सद्या शून्यावर असणार्‍या माजलगावचे कोव्हिड रुग्ण उद्या वाढल्यास जिल्हाधिकारी गुन्हा दाखल करणार का ? केला तर जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यावर करणार की सभापती सोनाली खुळे यांच्यावर करतात? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

आमदारांकडे पंचायत समिती नसली की ‘पंचायत’ होते-पालकमंत्री मुंडे

आपण आमदार असलो आणि पंचायत समिती आपल्याकडे नसली की मोठी पंचायत होते. पंचायत समिती ग्रामीण भागाशी जुळलेली असते आणि नेमकी तीच जर आमदारकडे नसेल तर मोठी पंचायत होते मग ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी निधी कसा वाटायचा असा प्रश्न आमदारांना पडतो माजलगावमध्ये तसं नाही झालं म्हणून काम मार्गी लागत आहेत असे उद्गार सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पंचायत समितीच्या नूतन इमारत लोकार्पण सोहळ्याप्रसंगी काढले.

यावेळी अध्यक्षस्थनी आ प्रकाश सोळंके,तर प्रमुख अतिथी म्हणून आ संदीप क्षीरसागर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार ,मुंबई कृउबा सभापती अशोक दक,बांधकाम सभापती जयंसिह सोळंके,मा आ बदमराव पंडित,राधाकृष्ण होके,बजरंग सोनवणे, जि.प. अध्यक्ष शिवकन्या सिरसाट,बाबुराव पोटभरे,कृउबा सभापती संभाजी शेजुळ ,नगराध्यक्ष शेख मंजूर,दयानंद स्वामी,खुर्शीद नाईक गटविकास अधिकारी एस जी हजारे उपस्थित होते. पुढे बोलताना विधानसभेला आम्ही चौघे निवडून आलो.आणखी एक आला असता पण होत्याच नव्हतं झालं आणि नव्हत्याच होत झालं पाचवा निवडून आला असता तर परत होत्याच नव्हतं झालं असत 64 आमदारांचा मुख्यमंत्री करण्याची ताकद पवार यांच्यात आहे असे मुंडे म्हणाले. महाराष्ट्रात सर्वात जास्त ऊस पिकवणारा ही बीड जिल्हा आणि देशभरातील ऊसतोड करणारा ही बीड जिल्ह्याचा आहे अशी आगळी वेगळी ओळख इतर कोणत्या जिल्ह्याची नाही असेही मुंडे म्हणाले. काही दिवसात पंचायत समितीच्या फर्निचरला निधी देतो,असा शब्द मुंडे यांनी दिला.

मराठवाड्याचा वेगळा इतिहास लिहावा -आ.सोळंके

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आज आपण साजरा करत आहोत माझी राज्यसरकरला विनंती आहे की मराठवाड्याचा वेगळा इतिहास लिहिण्याची व्यवस्था सरकारने करावी आणि लवकरात लवकर वेगळा इतिहास लिहावा. यावेळी कार्यक्रमाचे सूत्र संचलन अजित वाडेकर यांनी केले तर सभापती सोनाली खुळे यांनी प्रास्ताविक वाचून दाखवले आभार उपसभापती डॉ वसीम मनसबदार यांनी केले.

लोकार्पण सोहळा की सत्यनारायणाचा कार्यक्रम ; सभापतीला राष्ट्रवादीचा घरचा आहेर

माजलगाव पंचायत समितीचा लोकार्पण सोहळा आहे की घरचा सत्यनारायण हेच कळत नाही अशी बोचरी टीका माजलगाव पं.स.चे माजी सभापती व राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष विश्वंभर थावरे यांनी लोकप्रश्नशी संवाद साधताना केली.राष्ट्रवादीला हा घरचा आहेर मानला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष व तालुका अध्यक्ष वगळून बरीच मंडळी या कार्यक्रमात प्रमुख आहे.इतर पक्षाच्या पदाधिकारी कार्यक्रम पत्रिकेत घेऊन प्रशासकीय कार्यक्रम राजकीय केला असेल तर स्वपक्षीय पदाधिकारीची ऍलर्जी का असा सवालही थावरे यांनी केला आहे. कळेल त्यांना निवडणुकीच्या वेळेला पक्ष काय असतो. पक्षाच्या सिम्बॉलवर निवडून यायचं आणि परत पक्षाचीच ऍलर्जी असेल तर निवडणुकीत कळेल असेही थावरे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संघ अध्यक्ष व पक्ष कशाला म्हणतात हे उद्या येणार्‍या नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आम्ही पण दाखवू काय सत्यनारायणाचा कार्यक्रम नाही. कुठल्याही कार्यक्रमाला पक्ष पदाधिकारी नसतो फक्त पडत्या काळात पक्षाच्या कार्यकर्त्यांचा झेंडा धरण्यासाठी उपयोग केला जातो.आता सहनशीलता संपली आहे. जिल्हाध्यक्ष बजरंग बप्पाचे पक्षातील कार्यकर्त्यांकडे लक्ष नाही, ते पण सतेतच मग्न आहेत.खुप दिवसांपासून ते पक्षाचे अध्यक्ष आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या किती शाखा बजरंग सोनवणेंनी जिल्ह्यात काढल्या हे त्यांनी सांगितले पाहिजे असेही थावरे यावेळी म्हणाले.

लोकार्पण सोहळ्यावर स्थानिक काँग्रेस नाराज


आज जरी काँग्रेस किंवा सेना ला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधी नसले तरी पंचायत समिती इमारतीचा लोकार्पण सोहळा हा सार्वजनिक असून सदरील कार्यक्रमात जर भाजपाचे लोक जमत असतील तर जिल्ह्यात काँग्रेस ज्येष्ठ नेत्या रजनीताई पाटील, काँग्रेस समन्वयक रविंद्र दळवी, जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, वरिष्ठ नेते राजकिशोर मोदी, सारखे नेते कार्यरत असताना काँग्रेस ला सार्वजनिक कार्यक्रमातून डावलने हा काँग्रेसचा अवमान व महाविकास आघाडीच्या आचारसंहितेचा भंग आहे. येणार्‍या काळात काँग्रेस निश्चित आपल बळ दाखवल्याशिवाय राहणार नाही असे पत्रक दत्ता कांबळे जिल्हाध्यक्ष काँग्रेस अनु.जाती विभाग सदस्य संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती माजलगाव यांनी काढले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.