मराठा आरक्षणासाठी आज बीडमध्ये मराठा क्रांती संघर्ष मोर्चा
बीड । वार्ताहर
कोरोना लॉकडाऊन झुगारुन मराठा क्रांती संघर्ष मोर्चाच्या वतीने आरक्षणप्रश्नी आज शनिवारी (दि.4) बीडमध्ये राज्यातील पहिला मोर्चा येथे निघणार आहे. जिल्हा प्रशासनाने या मोर्चाला परवानगी दिलेली नाही, शिवाय शहरात ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच मोर्चात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीसांच्या गोपनीय शाखेकडून चित्रीकरण होईल. मोर्चा मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत;परंतु खबरदारी म्हणून तीन ड्रोन कॅमेर्यांचा वापर करण्यात येईल. याशिवाय रुग्णवाहिका, अग्निशामक दलाचा बंबही सोबत राहील, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी दिली.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर शिवसंग्रामचे आ.विनायक मेटे यांनी राज्यातील पहिला मोर्चा बीडमध्ये काढण्याचा इशारा दिला होता. आरक्षणप्रश्नी न्यायालयीन लढ्यासोबत रस्त्यावर देखील संघर्ष करण्याची भूमिका घेत आ. मेटे यांनी इतर संघटनांनाही या मोर्चात राजकीय मतभेद विसरुन सहभागी होण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, आ. मेटे यांच्या भूमिकेला आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी पाठिंबा दिला. शनिवारी निघणार्या मोर्चात नरेंद्र पाटील हे देखील सहभागी होणार आहेत. दुसरीकडे या मोर्चाला प्रशासनाने परवानगी दिलेली नाही, आपण धोक्याबाहेर नाहीत, लोकांचा विचार करावा, लोकांनीही कुटुंबियांचा विचार करुन घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकरी रवींद्र जगताप यांनी गुरुवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत केले आहे. त्यानंतर आज शनिवारी सकाळी 11 वाजता शहरातील जिल्हा क्रीडा संकुलातून मोर्चाला सुरुवात होणार आहे. सुभाष रोड, जालना रोड, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. दरम्यान मोर्चावेळी कोठेही गडबड, गोंधळ होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. अपर अधीक्षक सुनील लांजेवार हे बंदोबस्त प्रमुख म्हणून नियंत्रण ठेवतील. तीन उपअधीक्षकही दिमतीला राहतील. याशिवाय जिल्हाभरातून पोलीस कुमक बीडमध्ये तैनात राहील. शीघ्र कृती दल व राखीव पोलीस दलही सज्ज राहणार आहे.
बसस्थानक केले रिकामे!
बीडमध्ये निघणारा मराठा क्रांती संघर्ष मोर्चा हा मूक नसेल तो प्रशासन व शासनाला जाब विचारणारा असेल, असे संयोजकांनी स्पष्ट केलेले आहे. मोर्चा मार्गावरच बसस्थानक असून सध्या लॉकडाऊनमुळे बस उभ्याच आहेत. आंदोलकांनी बसेसला लक्ष्य करु नये यासाठी एसटी महामंडळाने खबरदारी म्हणून सर्व बस बार्शी रोडवरील विभागीय कार्यशाळेत हलविल्या आहेत. सध्या स्थानक रिकामे आहे.
एसपींकडून मोर्चा मार्गाची पाहणी
आज बीडमध्ये निघणार्या मोर्चाला परवानगी नसली तरी कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी पोलीस प्रशासनाने खबरदारी घ्यावी, असे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी पोलीस अधीक्षक आर. राजा यांना पत्राद्वारे कळविले होते. त्यानुसार पोलीस प्रशासनाने सावध पवित्रा घेतला असून शुक्रवारी (दि.4) पोलीस अधीक्षक आर. राजा,अपर अधीक्षक सुनील लांजेवार यांनी जिल्हा क्रीडा संकुलात भेट देऊन मोर्चा स्थळासह मार्गाची पाहणी केली. यावेळी बंदोबस्तावरील अधिकारी व अंमलदार यांना अधीक्षकांनी योग्य त्या सूचना दिल्या.
काँग्रेस मराठा विरोधी; कोणी कितीही
विरोध केला तरी मोर्चा काढणारच-आ.मेटे
मराठा आरक्षण संघर्ष मोर्चाला मिळणारा प्रतिसाद पाहून अनेकांचे पोट दुखत आहे. त्यामुळे अनेक जण याला विरोध करत आहेत हे चुकीचे असून काँग्रेसचा हा विरोध मराठा समाजाबद्दल असलेला आकस दाखवून देणारा आहे. मराठा समाज आणि महाराष्ट्राबद्दल काँग्रेसचे धोरण विरोधी राहिलेलं आहे असा आरोप करत कोणी कितीही विरोध केला तरी मोर्चा निघणारचं असे शिवसंग्रामचे अध्यक्ष आ.विनायक मेटे यांनी स्पष्ट केले.
बीड येथे शुक्रवारी (दि.4) दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत आ.मेटे बोलत होते. याप्रसंगी नरेंद्र पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.समाजबांधवांनी मोठ्या संख्येने मराठा क्रांती संघर्ष मोर्चात सहभागी व्हावे हा प्रश्न समाजाचा आहे. तुमच्या मुलांच्या शिक्षणाचा, नौकरीचा, भविष्याचा आणि गोरगरीबांचा आहे. कोणीही आडवा आडवी करणार नाही, जिथे अडचण येईल तिथे आम्ही मदतीला धावुन येऊ. त्यामुळे घाबरू नका, मोठ्या संख्येने संघर्ष मोर्चासाठी सकाळी 11 वा. श्रीमंतीयोगी छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुलावर या असे आवाहन आ.विनायक मेटे यांनी केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवरही टिका केली. राज्यात अशोक चव्हाण यांच्या नादी लागून काँग्रेसचे वाट्टोळे झाले आहे. अशोक चव्हाण यांनी समोरासमोर येऊन बोलावे असे सांगत स्व.अण्णासाहेब पाटील यांच्या मृत्यूला काँग्रेस जबाबदार आहे. त्यांनीच पाटील यांची हत्या केली असा खळबळजनक आरोपही आ.मेटे यांनी केला. शेतकर्यांच्या आत्महत्येला देखील काँग्रेस जबाबदार आहे असेही मेटे म्हणाले. याप्रसंगी नरेंद्र पाटील म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवे. सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकवुन ठेवण्यात या सरकारला अपयश आले त्याची जाणिव करून देण्यासाठी आणि त्यांच्या चुका दाखवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे. आ.विनायक मेटे आणि मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक यांच्या संयुक्तेने हा मोर्चा निघत असुन बीड जिल्ह्यातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन नरेंद्र पाटील यांनी केले.
भाजपच्या कुटील कारस्थानामुळेच सुप्रीम कोर्टात मराठा
आरक्षण रद्द झाले-काँग्रेस प्रवक्ते डॉ.संजय लाखे पाटील
मराठा आरक्षणाची सत्य घटनात्मक कायदेशीर बाजू मांडण्यासाठी मराठा आरक्षणाचे अभ्यासक,राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे प्रवक्ते डॉ.संजय लाखे पाटील हे शुक्रवार,दिनांक 4 जून रोजी बीड येथे आले होते.यावेळी पञकार परीषदेत बोलताना मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्द होण्यास केंद्रातील भाजप आणि महाराष्ट्रातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केलेले कुटील कारस्थानच जबाबदार आहे असे काँग्रेस प्रवक्ते डॉ.संजय लाखे पाटील म्हणाले.तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी सांगितले की,मराठा आरक्षणाबाबत तसेच ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण,वंचित बहुजन समाजाचे पदोन्नतीतील आरक्षण याबाबत भाजपकडून सातत्याने महाराष्ट्राची दिशाभूल केली जात आहे.
डॉ.संजय लाखे पाटील यांचा सध्या मराठवाडा दौरा सुरू असून शुक्रवार,दिनांक 4 जून 2021 रोजी बीड येथे जिल्हा काँग्रेस कमिटी मार्फत शासकीय विश्रामगृहात आयोजित पञकार परीषदेस जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी,विधी सेलचे प्रदेश सरचिटणीस अॅड.कृष्णा पंडीत,राजीव गांधी पंचायतराज संघटनचे विभागीय अध्यक्ष राणा चव्हाण,तालुकाध्यक्ष महादेव धांडे,शहराध्यक्ष इद्रिस हाश्मी,जिल्हा उपाध्यक्ष शहादेव हिंदोळे, ,जिल्हासरचिटणीस अॅड.राहुल साळवे, उपाध्यक्ष परवेज कुरेशी,सेवादल जिल्हाध्यक्ष योगेश शिंदे,ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष वचिष्ठ बडे,अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष गोविंद साठे,शिरूर तालुकाध्यक्ष सुनिल नागरगोजे,जयप्रकाश आघाव,चरणसिंग ठाकूर,गणेश करांडे,राहूल लोळगे,शेख सिराज आदींसह काँग्रेस पक्ष पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी लाखे पाटील म्हणाले की,मराठा आरक्षणासंदर्भात भारतीय जनता पक्षाकडून चुकीची माहिती देऊन मराठा समाजाची दिशाभूल केली जात आहे.भाजपाचा हा खोटारडेपणा आता उघड झाला आहे.मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्द होण्यास केंद्रातील भाजपचे मोदी सरकार आणि महाराष्ट्रातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारच जबाबदार आहे.ही वस्तुस्थिती समाजाला माहित करून देण्यासाठी मी राज्यभरात दौरा करीत आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी केंद्रातील मोदी सरकारने 102 वी बोगस घटनादुरूस्ती अत्यंत घाईत मंजूर केली आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 102 व्या घटनादुरूस्ती नंतर राज्यांना एसईबीसी प्रवर्ग जाहीर करण्याचे अधिकार नसताना देखिल 102 व्या घटनादुरूस्ती नंतर तब्बल 106 दिवसांनी मराठा समाजाला एसईबीसी आरक्षण कायद्याचा शासन आदेश काढून मराठा समाजाची घोर फसवणूक केली आहे.ही वस्तुस्थिती स्पष्ट असताना आता विरोधी पक्षातील नेते देवेंद्र फडणवीस,प्रवीण दरेकर,आशिष शेलार,चंद्रकांत पाटील हे पुन्हा एकदा मराठा समाजाची दिशाभूल करून कोविड असतानाही मोर्चे काढण्यास समाजाला प्रवृत्त करीत आहेत.महाराष्ट्रासाठी आदरस्थानी असणारे खासदार छञपती संभाजी महाराज यांना मराठा आरक्षणाविषयी चर्चा करण्यासाठी व हा प्रश्न सोडवण्यासाठी पंतप्रधान मोदी वेळ देत नाहीत,तसेच भेटत ही नाहीत.हा महाराष्ट्राचा घोर अवमान आहे.भाजपाच्या दिशाभूल व अपप्रचाराला मराठा तरूणांनी व समाजाने समजून घ्यावे असे डॉ.लाखे पाटील म्हणाले.तर आमदार मेटे यांनी मराठा समाजाची दिशाभूल थांबवावी असे आवाहन डॉ.संजय लाखे पाटील यांनी केले.
Leave a comment