मुंबई । वार्ताहर
राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येत घट होताना पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहे. आज रविवारी (30 मे 2020) रात्री 8.30 वाजता उद्धव ठाकरे सोशल मीडियाद्वारे जनतेशी संवाद साधतील. यावेळी ते कोरोना रुग्णसंख्या, लॉकडाऊन, कोरोना लसीकरणासह विविध विषयांवर चर्चा करणार आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे हे आज रविवार 30 मे 2021 रोजी रात्री 8.30 वाजता समाज माध्यमांवरून नागरिकांना संबोधित करतील
राज्यात गेल्या दीड महिन्यांपासून लॉकडाऊन आणि कडक निर्बंध लावण्यात आले आहे. पण गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई, पुण्यासह अनेक शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे लॉकडाऊन हटवावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दोन दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याबद्दल चर्चा झाली आहे. अखेर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रविवार 30 मे 2021 रोजी रात्री 8.30 वाजता समाज माध्यमांवरून नागरिकांना संबोधित करतील. यावेळी लॉकडाऊनबद्दल काय घोषणा करता, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, राज्यातील कोरोनाच्या स्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लावलेलं लॉकडाऊन पूर्णपणे उठवायचा प्रश्नच नसल्याचं सांगत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबत सरकारची नेमकी भूमिका काय असेल याचे संकेत दिले.
राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये अजूनही कोरोनाचा पॉझिटिव्हीटी रेट जास्त आहे त्या जिल्ह्यांमध्ये गो स्लो अशा पद्धतीनंच जावं लागणार आहे. त्यामुळं 15 दिवस लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये जवळपास पक्का झालेला आहे. पण त्यासाठीचं अंतिम नियोजन होत आहे. ज्याठिकाणी कोरोनाचा प्रादूर्भाव अत्यंत कमी झाला आहे, तिथं नेमका कसा निर्णय घ्यायचा. दुकानांच्या उघडण्याच्या वेळा वाढवायच्या का. इथर काही शिथिलता द्यायची का याचा निर्णय होत आहे. पण गर्दी होण्याच्या ठिकाणी कोणतीही शिथिलता मिळणार नाही.
सार्वजनिक कार्यक्रम, लग्न, राजकीय, धार्मिक कार्यक्रम याला तर 15 दिवस कुठलीही शिथिलता मिळणार नाही. मात्र ज्या जिल्ह्यांत कोरोनावर चांगलं नियंत्रण आहे, त्याठिकाणी निश्चितच शिथिलता मिळू शकते असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. मात्र पूर्णपणे लॉकडाऊन उठवण्याचा प्रश्नच येत नाही, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले.
व्यापाऱ्यांना दिलासा मिळणार?
राज्यातील व्यापारी संघटनेने 1 जूनपासून व्यापार, दुकाने सुरु करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री त्याबद्दल काय निर्णय घेतील, याकडेही व्यापाऱ्यांचे लक्ष आहे. दुकाने, व्यवसाय बंद असल्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. यामुळेचे येत्या 1 जूनपासून सर्व प्रकारचा व्यापार सुरु झालाच पाहिजे अशी मागणी ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ चे राष्ट्रीय संगठन मंत्री व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे वरीष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी महाराष्ट्र सरकारकडे केली होती.
राज्यात 1 जूननंतरही लॉकडाऊन वाढवला जाणार असल्याचे स्पष्ट संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिले होते. राज्यात 1 जूननंतरही निर्बंध कायम ठेवले जातील. त्याबाबत मंत्रिमंडळाचं एकमत झालं असल्याचं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं होतं. लॉकडाऊन कायम राहणार असला तरी त्यात काही शिथिलता देण्यात येणार आहे. सरसकट लॉकडाऊन उठवला जाणार नाही, असं राजेश टोपे यांनी सांगितलं होतं. काही जिल्ह्यात विशेषतः ग्रामीण भागात वाढत असलेली रुग्णसंख्या बघता आता असलेले निर्बंध तसेच ठेवावे असे मत आरोग्य विभागाने मांडले होते. पण काही विभागांनी निर्बंध शिथिल करावे अशीही भूमिका मांडली होती. त्यामुळे राज्यातील जिल्हाबंदी ही 10 जून नंतरच उठण्याची शक्यता आहे. दरम्यान 1 जूनपासून शासकीय आणि खासगी कार्यालय 50 टक्के क्षमतेने सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
महाराष्ट्रातील कोरोना स्थिती काय?
राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलेलं असून, रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत होती. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ठाकरे सरकारनं केलेल्या प्रयत्नांनाही यश येताना दिसतं आहे. राज्यात काल दिवसभरात 20,295 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना संक्रमणाचं प्रमाण हळूहळू कमी होत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत महाराष्ट्र पुन्हा अनलॉक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्यात काल 20,295 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 443 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यूदर हा 1.65 टक्के एवढा झाला आहे. राज्यात काल 20,295 नवीन रुग्ण सापडल्यानंतर सद्यस्थितीत 2,76,573 सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 57,13,215 झाली आहे.
Leave a comment