सामान्य लोकांसाठी 90 दिवसांचा गॅप
टोपेंनी मात्र महिनाभरातच घेतला दुसरा डोस
बीड । वार्ताहर
लसीकरणावरुन राज्यभरात गोंधळ सुरु आहे. दिवस दिवस रांगे उभा राहून लोकांना लस मिळत नाहीत.लसीची कमतरता असल्याने दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा सल्ला केंद्रीय आरोग्य पथकाने दिला आहे.राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील लसीकरणाबाबतीत लोकांना वेगवेगळे आवाहन केले आहे असे असतांनाही स्वतः राजेश टोपे यांनी मात्र केवळ 30 दिवसांच्या फरकानेच दुसराही डोस घेतला आहे. इकडे लोकांना लस मिळेना आणि आरोग्यमंत्र्यांनी मात्र महिनाभराच्या आतच दुसरा डोस घेतला हा प्रकार म्हणजे लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण अशातलाच काहीसा प्रकार असल्याच्या प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहेत.
कोरोना संसर्गाची दुसरी लाट सुरु झाल्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून राजेश टोपे यांनी यंत्रणा लावण्यासाठी जे काही परिश्रम घेतले आहेत ते नक्कीच वाखणण्याजोगे आहेत. आपल्या मातोश्रीचे निधन झाल्यानंतरही तिसर्याच दिवशी कामाला लागणारा मंत्री म्हणून राजेश टोपे यांचे राज्यात कौतुकही झाले मात्र गेल्या काही दिवसात राज्यातील आरोग्य यंत्रणा कशी ढेपाळली आहे. हे वेगळे सांगण्याची गरज नाही, रेमडेसिवीर, ऑक्सिजनच्या बाबतीत जो गोंधळ उडाला त्याला आरोग्य खातेच जबाबदार नाही काय हे खरे असले तरी राजेश टोपे यांनी नाशिकची घटना घडल्यानंतर काही धडाकेबाज आणि चांगले निर्णय नक्कीच घेतले. हे करत असतांना त्यांनी जालन्याला आणि मुंबईला झुकते माप दिले आणि उर्वरित महाराष्ट्रातील जिल्ह्याला सापत्नपनाची वागणूक दिली. लसीकरणामध्ये देखील जालन्याला त्यांनी झुकते माप दिले. इतर जिल्ह्यातील लस आपल्या जिल्हयामध्ये पळविली. राज्यभरात लसीकरणाची बोेंब सुरु झाल्यानंतर को-व्हॅक्सीन आणि कोव्हीशिल्ड या दोन लसीमध्ये किती अंतर असावे, जनतेने घाई करु नये असे राजेश टोपे यांनी सांगितले मात्र स्वतः पहिला डोस 19 एप्रिल 2021 रोजी घेतला आणि दुसरा डोस 18 मे 2021 घेतला महिनाभरातच दुसरा डोस स्वतः घेतला आणि लोकांना मात्र 85 दिवस वाट पहाण्याचे सल्ले देणे कितपत योग्य आहे याचा विचारही राजेश टोपे यांनी करायला हवा. राज्याच्या आरोग्यमंत्री यांनीच असा खोटारडा पणा केल्याने संतप्त भावना व्यक्त होत आहे.
Leave a comment