हा विजय जनतेचा, लोकांची ताकद पाठीशी : समाधान आवताडे

 

पंढरपूर | वार्ताहर

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला दणका दिला. भाजपचे समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके यांचा पराभव केला. राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज पार पडली. यामध्ये भाजप उमेदवार समाधान आवताडे हे ३ हजार ७३३ मतांनी विजयी झाले.

पंढरपूर पोट निवडणूक ही तीन पक्ष विरुद्ध भाजप अशी लढत होती. या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके यांचा विजय होतील असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जात होता. मात्र, हा दावा फोल ठरला असून अटीतटीच्या या लढतीत समाधान आवताडे यांनी भगीरथ भालके यांना धोबी पछाड देत बाजी मारली.

 

मतमोजणी सुरु झाल्यानंतर पहिल्या फेरीत भाजपाच्या समाधान अवताडेंनी ४५० मतांनी आघाडी घेतली होती. पहिल्या फेरीत अवताडेंना २ हजार ८४४ तर भालकेंना २ हजार ४९४ मतं मिळाली. दुसऱ्या फेरीत मात्र भालकेंनी ५०० हून आधिक मतांची आघाडी मिळवली. दुसऱ्या फेरीत भालकेंना ३ हजार ११२ तर अवताडेंना २ हजार ६४८ मतं मिळाली. तिसऱ्या फेरीअखेरीस भालकेंनी ६३५ मतांची आघाडी मिळवलीय. भालकेंना तिसऱ्या फेरीनंतर एकूण ८ हजार ६१३ मतं मिळाली आहेत तर आवताडेंना ७ हजार ९७८ मतं मिळाली आहेत. सातव्या फेरीपासून मात्र अवताडेंनी आघाडी घेतली आणि ती शेवटपर्यंत कायम ठेवली.

आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपुरात पोटनिवडणूक लागली. त्यामुळे आता भारत भालके यांचेच पुत्र भगीरथ भालके यांना पंढरपूरची जनता साथ देते, की डाव उलटवून समाधान अवताडे यांच्या गळ्यात विजयाची माळ घातले याकडे साऱ्या राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेर हा निकाल अवताडे यांच्या बाजूने लागला. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत एकूण ३ लाख ४० हजार ८८९ मतदार असून एकूण ५२४ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबवण्यात आली होती. गेल्या महिन्याभरात करोनाच्या निर्बंधांमध्ये देखील पंढरपूरसाठी या निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली होती. या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याच सभेमध्ये झालेली गर्दी आणि करोना नियमांची पायमल्ली हा चर्चेचा आणि राजकारणाचा देखील विषय ठरला होता. त्याचवेळी भाजपाकडून देखील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर दिग्गज नेत्यांनी पंढरपूरमध्ये सभा घेतल्या होत्या. दोन्ही बाजूंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आल्यामुळे या जागेच्या निकालांकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. या विजयानंतर भाजपाच्या अनेक नेत्यांनी ट्विटरवरुन अवताडे यांचं अभिनंदन केलं आहे.

 

जी सीट बापानं तीनदा जिंकली, ती पोराला का जिंकता आली नाही? 

चुकीचा उमेदवार

भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी कुणाला उमेदवारी द्यायची यावरून राष्ट्रवादीत संभ्रम होता. माजी आमदार औदुंबर अण्णा पाटील यांचे नातू अमरजित पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याची मागणी केली होती. मात्र, भालके यांच्या कुटुंबातीलच उमेदवार असावा म्हणून भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली. भगीरथ भालके हे दहा वर्षापासून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत. भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेले कारखान्याचे अध्यक्षपद भगीरथ भालके यांच्याकडे देण्यात आलं. 2017 मध्ये कासेगाव जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवली होती त्यात त्यांचा पराभव झाला होता. म्हणजे वडील आमदार असतानाच भगीरथ यांनी दोन चार वर्षापूर्वी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवूनही पराभूत झाले होते. त्यानंतर ते राजकारणात फारसे दिसले नाहीत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भगीरथ यांचा पराभव झालेला असतानाही त्यांना राष्ट्रवादीने विधानसभेचं तिकीट दिलं. त्यामुळे राष्ट्रवादीने चुकीचा उमदेवार दिल्याची पंढरपूरकरांमध्ये भावना होती. त्यामुळेही त्यांचा पराभव झाल्याचं बोललं जात आहे.

डबघाईला आणलेला विठ्ठल साखर कारखाना

भालके यांच्या निधनानंतर भगीरथ यांच्याकडे विठ्ठल साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची सूत्रे आली. कारखान्याच्या एकूण 21 पैकी 3 संचालकांचे निधन झाले आहे. आज बैठकीला उपस्थित असलेल्या 18 संचालकांनी भगीरथ भालके यांच्या नावाला पसंती दिली. भगीरथ भालके हे गेल्या दहा वर्षांपासून संचालक मंडळात काम करत आहेत. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे विस्तारीकरण करण्यात आले. परंतु गेल्या काही वर्षात कारखान्यावर कर्जाचा मोठा डोंगर उभा राहिला. इतिहासात पहिल्यांदाच कारखाना बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली होती. यंदाचा गळीत हंगाम सुरु करण्यासाठी भारत भालकेंनी कर्ज मंजूर करुन घेतल्याने कारखाना पुन्हा सुरु झाला. साखर कारखाना अडचणींतून बाहेर काढण्याची जबाबदारी भगीरथ भालकेंवर आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून भालके कुटुंबीयांना कारखाना कर्जातून बाहेर काढता न आल्याने कामगारांच्या रोषाचा भगीरथ यांना फटका बसल्याचं सांगण्यात येतं.

जनतेशी संपर्क नाही

भगीरथ यांनी चार वर्षापूर्वी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. त्या आधी किंवा त्यानंतर त्यांचा जनतेशी संपर्क आला नाही. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांनी जनसंपर्क ठेवून लोकांची कामे करायला हवी होती. मात्र त्यांनी ते केलं नाही. त्याचा फटकाही त्यांना बसल्याचं या निवडणुकीत दिसून आलं. या उलट भाजपचे समाधान आवताडे हे गेल्या काही वर्षांपासून थेट जनतेच्या संपर्कात होते. समाधान आवताडे यांनी गेल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. आवताडे गटाच्या ताब्यात दामाजी शुगर, पंचायत समिती, जिल्हा परिषद सभापती, सहकारी संस्था आणि अनेक ग्रामपंचायती आहेत. त्यांचे ग्रामीण भागात चांगले जाळे आहे. त्याचा त्यांना फायदा झाल्याचं दिसून आलं आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत भारत भालके यांना 89 हजार 87 मते मिळाली होती. तर भाजपचे उमेदवार सुधाकर परिचारक यांना 76, 426 मते मिळाली होती. तर अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांना 54 हजार 124 मते मिळाली होती. अपक्ष उमेदवार असूनही आवताडे यांनी 50 हजाराच्यावर मते घेतली होती. त्यामुळे भाजपचा पराभव झाला होता. यावेळी त्यांना भाजपने तिकीट दिलं आणि सुधाकर परिचारक यांनी त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली. त्यामुळे आवताडे यांनी या निवडणुकीत बाजी मारल्याचं दिसून आलं.

यंत्रणा तोडकी, साधनं नाही

निवडणूक मॅनेजमेंटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा अपयशी ठरली. भाजपच्या तुलनेत राष्ट्रवादीची यंत्रणा अत्यंत तोडकी होती. या निवडणुकीत भाजपने सोशल मीडियापासून कॉर्नर बैठकांपर्यंतच्या सर्व प्रचार तंत्रावर जोर दिला होता. त्या तुलनेत आवताडे यांची यंत्रणा कुठेच दिसत नव्हती. शिवाय परिचारक कुटुंबाने आवताडे यांचा प्रचार केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आवताडेंसाठी जोरदार बॅटिंग केली. प्रचंड मोठ्या सभा घेतल्या. त्या तुलनेत राष्ट्रवादीचे मोजकेच नेते या मतदारसंघात फिरले. उपमुख्यमंत्री अजित पवार उशिराने प्रचारासाठी आले. तर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्यक्ष न येता व्हर्च्युअल सभा घेतली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार अॅडमिट असल्याने ते प्रचाराला येऊ शकले नाही. राष्ट्रवादीकडून केवळ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीच एक हाती किल्ला लढवला. या मतदारसंघात 15 टक्के धनगर समाज आहे. हा मतदार भारत भालके यांच्याबाजूने होता. मात्र, आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजात जाऊन स्थानिक नेत्यांशी चर्चा केली. कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यावेळी धनगर समाजातील पडळकरांनी क्रेझ दिसून आली. धनगर समाजातील एकमेव मंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील धनगर नेत्यांशी चर्चा केली. मात्र, त्याचा फारसा परिणाम झालेला दिसला नाही. (why Bhagirath Bhalke loss in Pandharpur Assembly By-election, read five reason)

राज्य सरकारच्या कामगिरीवर नाराज

भगीरथ यांना या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अपयशाचाही फटका बसल्यांच दिसून आलं. राज्य सरकारने कोरोनाचं संकट नीट हाताळलं नाही. विठ्ठलाचं मंदिरही या सरकारने बंद केलं. संकटाच्या काळात अव्वाच्या सव्वा वीजबिल पाठवलं, शेतकऱ्यांना त्रास दिला, शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही, कोरोना संकटात आर्थिक मदत दिली नाही, आदी मुद्दे लोकांपर्यंत पोहोचवण्यात आणि सरकारविरोधी वातावरण तयार करण्यात भाजप यशस्वी ठरले. त्याचा अप्रत्यक्ष फटका भगीरथ यांना बसल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

 

 

पंढरपूरात तोंडावर, बंगालमध्ये “नाक वर”

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या पराभवाने महाविकास आघाडी तोंडावर पडली आहे… तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी आपल्या पडेल उमेदवाराबद्दल ट्विट न करता बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी विजय मिळविला, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून विरोधकांचे “नाक वर” असल्याचे दाखवून दिले आहे.

शरद पवारांनी ममतांचे अभिनंदन करणारे ट्विट करताना यापुढे एकत्र येऊन जनतेसाठी काम करण्याचे त्यांना आवाहन केले आहे. यावर मराठी चॅनेलनी चर्चेचे पेव उघडून त्या ट्विटमधला राजकीय अर्थ शोधण्याचा प्रयत्न चालविला आहे.

शरद पवार हे २०२४ पूर्वी प्रादेशिक पक्षांची मोट बांधून तिसऱ्या आघाडीची रचना करणार असल्याचा जावईशोध  चॅनेली नी लावला आहे. त्यात त्यांनी परस्पर त्या आघाडीचे नेतृत्व ऐतिहासिक विजय मिळविणाऱ्या ममता बॅनर्जी यांना देऊनही टाकले आहे.

पण पंढरपूरमध्ये महाविकास आघाडीने एकत्र येऊन दिलेल्या उमेदवाराचा दणकून पराभव झाल्याबद्दल जपून जपून बोलायला सुरूवात केली आहे किंवा त्यावर बोलायचे टाळत तरी आहेत. उलट ममता बॅनर्जी यांच्या विजयाबद्दल राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते तावातावाने सोशल मीडियावरील चर्चेत व्यक्त होताना दिसत आहेत. शरद पवारांच्या ट्विटनंतर तर त्यांचा जोर वाढला आहे. ममतांचा विजय जणू आपलाच आहे, अशा थाटात ते सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.

सविस्तर बातमी थोड्याच वेळात

 

 

 

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.