आज साडेसात हजार जणांना पाच केंद्रांवरुन मिळणार लस
बीड । वार्ताहर
महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचा प्रारंभ आज शनिवारी (दि.1)होत आहे. बीड जिल्ह्यात 18 ते 44 वयोगटातील सुमारे 14 लाख 57 हजार लाभार्थी असून पहिल्या दिवशी केवळ साडेसात हजार लस प्राप्त झाल्या आहेत. पाच केंद्रांवर लसीकरण सुविधा असेल. लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी अनिवार्य असून ऑफलाइनची सोय उपलब्ध नसणार आहे.
सामान्य नागरिकांसाठी लस उपलब्ध झाल्यानंतर सुरुवातीला ज्येष्ठांना संधी दिली गेली. त्यानंतर वयोमर्यादा 45 पर्यंत खाली आणण्यात आली होती. मात्र, 18 वर्षांवरील नागरिकांना लस द्यावी, अशी मागणी होती. शासनाने नुकताच याबाबतचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार चौथ्या टप्प्यात 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण 1 मे पासून सुरु होणार आहे.जिल्ह्याची लोकसंख्या 31 लाख असून त्यापैकी 47 टक्के लोक हे 18 ते 45 वयोगटातील आहेत तर 18 वर्षांवरील सर्व नागरिकांचा टक्का 78 इतका आहे. सुरुवातीला लसीकरणाकडे नागरिकांनी पाठ फिरवली;परंतु नंतर ज्येष्ठांनी चांगला प्रतिसाद दिला. 45 वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरणाचे प्रमाणही चांगले आहे. 18 वर्षांपुढील नागरिकांच्या लसीकरणासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेने जय्यत तयारी करण्यात आली आहे.जिल्ह्यात 18 वर्षावरील एकूण लाभार्थींची संख्या 14 लाख 57 हजार इतकी असून यासाठी जिल्ह्यास 143 लसीकरण केंद्र असणार आहेत.जिल्ह्यात आजपर्यंत 45 वर्षांवरील 90 हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
18 वर्षांवरील सर्व लाभार्थ्यांसाठी लसींची मागणी नोंदवलेली आहे. टप्प्याटप्प्याने लस उपलब्ध होतील. लाभार्थ्यांनी आधी ऑनलाईन नोंदणी करावी व दिलेल्या तारखेला केंद्रावर जावे. विनाकारण गर्दी करु नये. ऑफलाईन व स्पॉट रजिस्ट्रेशनची सुविधा नाही. त्यामुळे नोंदणी सर्वांना बंधनकारक आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिसन पवार यांनी दिली. याबाबत लसीकरण नोडल अधिकारी डॉ.संजय कदम म्हणाले, शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत साडेसात हजार लस उपलब्ध होत आहेेत. रात्रीतून या लसींचे पाच ठिकाणी वितरण होणार आहे. सर्व तालुका आरोग्य अधिकारी संपर्कात आहेत. ऑनलाइन नोंदणीमुळे लसीकरणादरम्यान गडबड होणार नाही. 18 वर्षांवरील नागरिकांनी नोंदणी करुन लसीकरणाचा लाभ घ्यावा.
या केंद्रांवर मिळेल लस
18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांसाठी पहिल्या टप्प्यात पाच केंद्रांवर आजपासून लसीकरण सुरु होईल. यात जिल्हा रुग्णालय, अंबाजोगाईतील स्वाराती रुग्णालय, आष्टीतील ग्रामीण रुग्णालय, गेवराईत पालिका व परळीत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र या संस्थेचा समावेश आहे.
Leave a comment