बीड । वार्ताहर
पुरवठा विभागातील शासकीय गोदामांमधून स्वस्त धान्य दुकानदारांना पुरविल्या जाणार्या धान्यात भलतेच लोक साठेमारी करतात, तसेच धान्य कमी देतात, अशा तक्रारी होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने गुरुवारी स्वत: जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी बीडच्या शासकीय गोदामावर छापा मारत तब्बल पाच तासाहून अधिक वेळ या गोदामाची झाडाझडती घेतली होती. दरम्यान संबंधीत गोदामरक्षक शिवशंकर मुंडे याची उचलबांगडी करत दोन्ही गोदामांची जबाबदारी अन्य कर्मचार्यांकडे सोपवण्यात आली आहे.
गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शासकीय धान्य गोदामाला भेट दिली. त्यावेळी एक वाहन स्वस्त धान्य दुकानाला धान्य पुरवठा करण्यासाठी जात होते. या वाहनामध्ये कागदोपत्री उल्लेख असलेल्या संखेपेक्षा तीन पोते कमी असल्याची बाब जिल्हाधिकार्यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर जिल्हाधिकार्यांनी गोदामात जाऊन पोत्यांचे वजन करणे सुरु केल्यानंतर प्रचंड अनियमितता समोर आली होती. या संदर्भात रात्री उशीरापर्यंत कारवाई सुरुच होती. जिल्हा प्रशासनाने या संदर्भात मोठा निर्णय घेतला. गोदाम रक्षक शिवशंकर मुंडे याचा तडकाफडकी पदभार काढून घेत दोन्ही गोदामांची जबाबदारी अन्य कर्मचार्यांकडे सोपवण्यात आली आहे. जिल्हाधिकारी रेखावार यांनी केलेल्या कारवाईमुळे घोटाळेबांजामध्ये खळबळ उडाली.
Leave a comment