आष्टी । वार्ताहर
गावी परतणार्या ऊसतोड मजुरांना नगर जिल्ह्यातील खेड येथे पोलिसांनी अडवून ठेवले होते. दरम्यान त्यांच्या समस्या ऐकण्यासाठी गेलेल्या आ. सुरेश धस यांच्यावर सीमाबंदीसह जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले म्हणून गुरुवारी (दि.3) आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 , संचारबंदी व जमावबंदी आदेश लागू आहे. शिवाय बीड जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद केल्या आहेत. दरम्यान, आष्टी, पाटोदा, शिरुर तालुक्यातील अनेक ऊसतोड मजूर सध्या परतीच्या वाटेवर आहेत. मात्र, कोरोनाच्या संसर्गाचा धोका ओळखून त्यांना जागोजागी अडवून तात्पुरत्या निवारा कक्षात पाठविले जात आहे. खेड (जि.अहमदनगर) येथे देखील काही ऊसतोड मजुरांना पोलिसांनी रोखून धरले होते. साखर कारखानदारांनी हलगर्जी करुन त्यांना आहे त्याच ठिकाणी सुविधा पुरवून ठेवण्याऐवजी गावी पाठविले व रस्त्यात पोलिसांनी अडवून ठेवल्याने आ. सुरेश धस हे बुधवारी पहाटे खेडला गेले होते. मात्र, सीमाबंदी असताना ते खेडमध्ये गेले व संचारबंदी तसेच जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून त्यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. पो.ना.प्रशात क्षीरसागर यांनी यासंदर्भात फिर्याद दिली.आ. धस यांच्यावर गुन्हा नोंद झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उपनिरीक्षक अमितकुमार करपे हे अधिक तपास करत आहेत.
मी माझे काम केले-आ.धस
माझ्याकडून कायद्याचे उल्लंघन झाले असून,माझ्यावर प्रशासनाने जो गुन्हा दाखल केला त्याबाबत आपले काहिही मत नाही.प्रशासानेने त्यांचे काम केले असून,मी माझे काम केले आहे अशी प्रतिक्रिया आ.सुरेश धस यांनी व्यक्त केली.
Leave a comment