बीड । वार्ताहर
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप व त्यांच्या कुटूंबियांकडून कोरोना लॉकडाऊनच्या स्थितीत कोणीही उपाशीपोटी राहू नये हा उद्दात विचार समोर ठेवून मागील वीस दिवसांपासून तब्बल 300 जणांसाठी सकाळ व सायंकाळ अशा दोन वेळेसच्या जेवणाची व्यवस्था केली जात आहे. हा डब्बा संबंधितांना वाहनातून जिथल्या तिथे पोहचवला जात असल्याने जेवणारा प्रत्येकजण समाधानाच्या तृप्तीचा ढेकर देत अनिल दादा जगताप यांना आशिर्वाद देत आहे. जगताप कुटूंबियाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे.
मागील वीस दिवसांपासून बीड जिल्हा संपूर्णत: लॉकडाऊन आहे. अशावेळी बीडमध्ये अत्यावश्यक सेवेतील घटकांसह ज्याना गरज आहे अशा लोकापर्यंत अनिल जगताप यांचे कुटूंबिय जेवणाचा गरम व सुरुची भोजनाचा डब्बा पोहचवत आहेत. अत्यंत नियोजनध्द पध्दतीने व स्वच्छतेचे नियम पाळून हा डब्बा पोहचवला जात आहे. या रुचकर जेवणात तेल चटणी,लोणचं, पापड असे रोज वेगळे पदार्थ असतात. स्वतःचा जीव धोक्यात घालून अत्यावश्यक सेवा बजावणार्या घटकांना तसेच निराधार, गरिब, व गरजूंनाही दोनवेळच प्रेमाचं जेवण जगताप कुटूंबिय पोहचवत आहे. महत्वाचे हे की या उपक्रमात जगताप कुटूंबातील 72 वर्षीय आजीपासून ते बारा वर्षाच्या मुलापर्यंत सगळेच घरातून हातभार लावत आहेत.अनिलदादा जगताप,किशोर जगताप,विजय जगताप या तिघा बंधूंनी डब्बे पाठवण्याचे ठरवले. सुरुवातीला फक्त 80 डब्याचा स्वयंपाक केला जायचा. मात्र आता 300 पेक्षाही जास्त डब्बे अत्यावश्यक सेवेतील घटकांना पुरवले जात आहेत. या कामात आज्जी निलावती बाईंच्या तिन्ही सुना मदत करत आहेत. विशेष म्हणजे येथे दररोज रुचकर जेवण देताना उद्या काय पौष्टिक जेवण द्यायचे यावर संपूर्ण कुटुंब एकत्रित बसून विचारमंथन करतं आणि मगच निर्णय घेतला जातो.यासाठी विजय जगताप स्वतः भाजी बनवतात. चपाती, पोळी भाजण्यापासून चटणी लोणचं भरून डब्बे देईपर्यंत सगळे लक्ष देतात,.त्यात काही शेजार्यांची देखील मदत होते. दोन भाजा, पाच चपाती, भात, कधी मसाला भात, डाळ खिचडी, स्वीट, त्यासोबत कांदाही दिला जातो. असा संपूर्ण आहार असलेला डब्बा पोचविण्यासाठी मग धावपळ सुरू होते. प्रत्येकाला डबा पोचवणे, जेवण झाल्यावर पुन्हा घेऊन येणे, स्वच्छ धुणे, आदी सर्व करण्यासाठी तरुण मित्रांनी सहकार्य केले.
सेवाकार्य करत राहू-अनिल जगताप
कोरोना सारख्या जीवघेण्या संकटात आपण काय करू शकतो? तर जी माणसं अहोरात्र सेवा करतात, त्या पोलीस कर्मचार्यांना लॉकडाऊनमुळे जेवण मिळत नाही. साधं पाणी देखील मिळणं मुश्किल होतं. तेव्हा आम्ही सर्व कुटुंबातील सदस्यांनी हा निर्णय घेतला. हे आता लॉकडाऊनसंपेपर्यंत हे सुरू ठेवणार आहोत, असा शब्द त्यांनी दिला.
Leave a comment