पुणे । वार्ताहर
कोरोना या विषाणू संसर्गाच्या विळख्यातून सुटका करुन घेण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. तो अपरिहार्य असला तरी या निर्णयामुळे हातावर पोट असणारे, मजूर, देवदासी, लॉकडाऊनमुळे अडकून पडलेले यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुण्यातील विद्यार्थी साहाय्यक समितीतील माजी विद्यार्थ्यांनी अशा व्यक्तींसाठी पुढाकार घेतला आहे. वसतीगृहातील मेसचा वापर करुन या लोकांना अन्न देण्याचे कार्य या माजी विद्यार्थ्यांमार्फत केले जात आहे.
याकामी समितीचे माजी विद्यार्थी सुनील चोरे, गणेश काळे, जीवराज चोले, रत्नाकर मते यांनी पुढाकार घेतला. समितीचे कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड, माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी यांनी त्यासाठीचे प्रारूप तयार केले. 300 माजी विद्यार्थांनी एकाच दिवसात प्रत्येकी 2,500 रुपये माजी विद्यार्थी मंडळाच्या खात्यावर जमा करत सामाजिक कार्यातील एकजूट आणि सहृदयता दाखवून दिली.पुणे शहर पोलीस, लोकप्रतिनिधी, पत्रकार संघटना, सामाजिक संस्था, विनोद मिरगणे यांच्या वाटप व्यवस्थेद्वारे आज पुण्यातील अडल्या-नडलेल्यांना, गरजुंना जेवण पुरवले जात आहे.याकामी माजी विद्यार्थ्यांचे स्नेही, नातेवाईक, परिचित तसेच समितीचे कर्मचारी, कार्यकर्ते, समाजातील अनेक अनेक देणगीदार मदत करत आहेत. आतापर्यंत 50 हजार लोकांच्या भोजनाची सोय होईल एवढे काम झाले आहे. परंतु सुमारे एक लाख लोकांना भोजन देण्याचा संकल्प विश्वस्त मंडळाने केला आहे.
Leave a comment