मोदी यांनी ३० एप्रिल ऐवजी ३ मे ही तारीख का निवडली, हे आहे खरं कारण?
मुंबई : देशात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे. काही ठिकाणी गंभीर हॉटस्पॉट जाहीर करण्यात आली आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचा धोका सर्वाधिक आहे. मुंबईत कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहेत. तसेच दिल्लीतही कोरोनाचा धोका कायम आहे. त्यामुळे दिल्ली आणि महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढविण्याची मागणी होत होती. तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सच्यावेळी अनेक मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे लॉकडाऊन वाढविण्याची मागणी केली होती. आज मोदी यांनी दुसऱ्यांदा लॉकडाऊन वाढविल्याचे जाहीर केले. मोदी हे ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करतील अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांनी ३ मेपर्यंत हे लॉकडाऊन वाढविले. आणखी १९ दिवसांची लॉकडाऊनमध्ये आता भर पडली आहे.
पंजाब, राजस्थान आणि महाराष्ट्र या राज्यांनी ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढविल्याचे जाहीर केले होते. तसेच लॉकडाऊन हे जास्तीत जास्त ३० एप्रिलपर्यंत वाढविले जाईल, अशी शक्यता होती. मात्र, मोदी यांनी पुन्हा चकवा दिला. मोदी यांनी ३ मे तारीख का निवडली असावी, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. सरकारी सूत्रांने दिलेल्या माहितीनुसार, १ मे रोजी सार्वजनिक सुट्टी असते. २ तारखेला शनिवार आणि ३ तारखेला रविवार असल्यानेच मोदी यांनी ३ मे ही तारीख निवडली आहे.
दरम्यान, मोदी यांनी देशातील जनतेशी आज सकाळी १० वाजता संवाद साधला. ते म्हणालेत, कोरोनाचा फैलाव अद्यापही रोखण्यात यश आलेले नाही. त्यासंबधी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली. लॉकडाऊन वाढवला जावा, असा सल्ला देण्यात आला आहे. अनेक राज्यांनी आधीच हा निर्णय घेतला आहे. सर्व सूचना ऊक्षात घेता लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे सुरू असलेला लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्यात आलाय. पंतप्रधान मोदींनी आज ही मोठी घोषणा केली. लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय राज्यांनी केलेल्या सूचनांनंतर करण्यात आल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय.
कोरकोनाविरोधातल्या लढाईत आता कठोरता वाढवण्यात येणार आहे. २० एप्रिल पर्यंत प्रत्येक गोष्ट बारकाईने केला जाईल. प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेतला जाईल. प्रत्येक क्षेत्राचं मुल्यांकन करण्यात येईल. जिथे कोरोनाचे रुग्ण कमी आढळतील, जिथे हॉटस्पॉट वाढणार नाही अशा ठिकाणी २० एप्रिलनंतर काही काही सेवा सुरू केल्या जातील. सरकार यासंदर्भात एक गाईडलाईन उद्या जारी करणार आहे.
Leave a comment