मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. तसेच नेमक्या कोणत्या मतदार संघात उमेदवार उभा करणार? आणि कुणाला पाठिंबा देणार हे देखील जरांगेंनी सांगितले.त्यामुळे आता महायुती आणि महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं आहे.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारला. त्यांच्या आंदोलनानंतर सरकारनं मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली. मात्र मनोज जरांगे पाटील आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या मागणीवर अजूनही ठाम आहेत. मात्र दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या या मागणीला जोरदार विरोध होत आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मराठा आरक्षणाचा निर्णय होईल अशी अपेक्षा होती. मात्र निवडणूक आयोगानं निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आणि आचारसंहिता सुरू झाली.
या पार्श्वभूमीवर आज मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी मोठा घोषणा केली आहे. जिथे निवडून येईल तिथे आपला उमेदवार उभा करा असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. तर जिथे आपले उमेदवार निवडून येणार नाहीत तिथे जो उमेदवार मराठा आरक्षणाची बाजू मांडेल असं बॉन्डवर लिहून देईल त्याला निवडून आणा. नसेल लिहून देत तर त्याला पाडा. जिथे एस्सी एसटीचे उमेदवार आहेत तिथे उमेदवार उभे करू नका, जो उमेदवार आपल्या विचाराचा असेल तर त्याला मत देऊन निवडून आणा असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
तसेच आपला उमेदवार कोणत्या मतदारसंघामधून निवडून येऊ शकतो? तसेच कोणत्या मतदारसंघात मुस्लिम-दलीत एकत्र आहेत, ते देखील पाहू. तुम्ही उमेदवारी अर्ज भरा, अर्ज मागे घ्यायच्या दिवशी मी तुम्हाला सांगेल की कोणी अर्ज मागे घ्यायचा आणि कोणी अर्ज घ्यायचा नाही. पण तुम्ही उमेदवारी अर्ज भरा. मी समीकरण जुळवतो, असं म्हणत मनोज जरांगे यांनी उमेदवार निवडणुकीत उतरवण्याची घोषणा केली आहे.
मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?
मनोज जरांगे यांनी मराठा समजाला संबोधित करत विधानसभा निवडणुकीसाठी आपली भूमिका जाहीर केली आहे. त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचे सांगितले असून वेगवेगळ्या मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करा असे निर्देश दिले आहेत. सोबतच उमेदवारी अर्ज दाखल करताना नेमकी काय रणनीती असेल? याबाबतही जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ज्या मतदारसंघातून उमेदवार निवडून येण्याची शक्यता असेल, त्याच जागेवर जरांगे उमेदवार देणार आहेत. या निवडणुकीसाठी हा पहिला निकष असेल. सोबतच राज्यात जो मतदारसंघ राखीव आहे, त्या जागेसाठी जारांगे उमेदवार देणार नाहीत. सोबतच तिसरा निकष म्हणून जिथे उमेदवार उभा केला जाणार नाही, तिथे उभ्या राहिलेल्या उमेदवाराकडून 500 रुपयांच्या बाँडवर लिहून घेतले जाणार आहे. जो मराठा आरक्षणाच्या भूमिकेला समर्थन देईल, त्यालाच मतदान द्यावं, असं जरांगे यांनी म्हटलं आहे.
Leave a comment