शिवसंग्रामच्या नेत्या डॉ.ज्योतीताई मेटे यांची माहिती
बीड | वार्ताहर
दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे यांच्या जयंतीनिमित्त कृतज्ञता सप्ताह संपन्न होत आहे. यात रक्तदान शिबिराबरोबरच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांचे मुलांचे शैक्षणिक पुनर्वसन, वृक्ष लागवड, पर्यावरण संवर्धन आणि शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांसाठी विशेष योजना अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे. हा सप्ताह आम्ही विविध संघटनांना सोबत घेऊन राबवला. याची सांगता येत्या 30 जून रोजी बीड येथे होणार आहे. याप्रसंगी मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यासह अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांची उपस्थिती राहणार आहे अशी माहिती शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. ज्योतीताई मेटे यांनी दिली.शेतकऱ्यांसाठी शिवसंग्राम कार्यालयात मोफत पीक विमा अर्ज भरून घेण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांनी यासाठी आवश्यक कागदपत्रे घेऊन यावे असेही याप्रसंगी डॉ. ज्योतीताई मेटे यांनी सांगितले.
बीड येथील शिवसंग्राम कार्यालयात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. याप्रसंगी शिवसंग्रामचे नेते प्रभाकर आप्पा कोलंगडे, अनिल घुमरे, नारायण काशीद, सुहास पाटील, गोपीनाथ घुमरे, मनोज जाधव आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी डॉ. ज्योतीताई मेटे म्हणाल्या, दरवर्षी लोकनेते विनायक मेटे यांचा वाढदिवस विविध समाज उपयोगी उपक्रमांनी साजरा व्हायचा. त्यांच्या विचारांचा त्यांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जाण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि या प्रयत्नांना चांगले यश येत आहे हे आमच्यासाठी खूप सकारात्मक आहे.
वृक्ष लागवडीमध्ये नारळ आणि केशर झाड लागवडीचा उपक्रम यंदा आम्ही हाती घेतला आहे. उद्या मांजरसुंबा येथे रक्तदान शिबिर संपन्न होत आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबाचे शैक्षणिक पुनर्वसन आम्ही केले, हे आमच्या या सप्ताहाचे सर्वात मोठे यश आहे. बीडमध्ये पोलीस भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारासाठी भोजन व्यवस्था केली आहे. काही वर्षांपूर्वी पुण्यात एमपीएससी परीक्षेसाठी येणाऱ्या मुलांना रविवारी मेस बंद असल्याने मेटे साहेबांनी मुलांसाठी मोफत भोजन व्यवस्था केली होती.तसेच स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन सत्र ते आयोजित करायचे. तिथे मी मार्गदर्शन करण्यासाठी गेलेले आहे. त्यावेळीची आता आठवण येत असल्याचेही डॉ.ज्योतीताई मेटे म्हणाल्या.
सध्या खरीप पिक विमा भरून घेतला जात आहे. शेतकऱ्यांसाठी आम्ही शिवसंग्राम कार्यालयात मोफत पीक विमा अर्ज भरून घेण्यास सुरुवात केली असल्याचेही त्या म्हणाल्या. याबरोबरच शिवसंग्रामच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी आम्ही एक योजना आणली आहे, त्याची घोषणा 30 जून रोजी आम्ही करणार आहोत असे यावेळी डॉ.ज्योतीताई मेटे यांनी सांगितले.
लोकनेते विनायकराव मेटे यांच्या जयंतीनिमित्त यंदा आयोजित कृतज्ञता सप्ताहामध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले त्याची सांगता 30 जून रोजी होत आहे. यानिमित्त बीड येथे कृतज्ञता सप्ताह निमित्त स्मृतीस्थळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, याप्रसंगी उपस्थित रहावे असे आवाहनही त्यांनी केले.
Leave a comment