महायुती अन् मविआच्या नेत्यांना जनतेने स्वीकारले की धुडकावले, फैसला लवकरच

 

 

बीड । सुशील देशमुख

बीड लोकसभा मतदार संघासाठी विक्रमी 70.92 टक्के मतदान झाले आहे. या निवडणूकीसाठीचे मतदान झाल्यानंतर आता महायुती असो की, महाविका आघाडी या दोन्ही मोठ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या मतदारसंघात कसे काम केले, किती काम केले अन् अधिकाधिक मतदान मिळवण्यास ते यशस्वी ठरले का? याची खरी कसोटी आता येत्या 4 जूनच्या मतमोजणीदिवशी लागणार आहे. शिवाय नेत्यांच्या नुसत्याच तोंडच्या वाफा होत्या की, खरंच त्यांनी झोकून देवून निवडणूकीचं काम केलं हे ही स्पष्ट होणार आहे.

 

बीड लोकसभा निवडणूकीसाठी सोमवारी मतदानाची प्रक्रिया मोठ्या उत्साहात पार पडली. राज्यात ज्या 11 लोकसभा मतदार संघासाठी मतदान झाले, त्यात सर्वाधिक मतदान बीड लोकसभा मतदार संघात झाले आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अनेक गावचे मतदान बाहेर गावाहून गावी येवून मतदान करुन परत गेले. ठिकठिकाणच्या मतदान केंद्रावर भर ऊन्हात मतदानासाठी गर्दी दिसून आली. दरम्यान या निवडणूकीत प्रचाराचे मुद्दे जर लक्षात घेतले तर मराठा आरक्षण आंदोलन, जिल्ह्याच्या विकासाच्या योजना या भोवतीच प्रचार फिरत राहिला. दोन्हीकडील पक्षांचे ‘हेवीवेट’ नेत्यांनी बीडमध्ये येवून उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेत अधिकाधिक मतदारांना आपल्याच उमेदवाराला मतदान का करायचे, हे पटवून दिले.

महाराष्ट्रात ज्या प्रमुख नेत्यांच्या लढती झाल्या त्यात बीडची लढत कायमच चर्चेत राहिली असल्याचे दिसून आले. या ठिकाणी भाजप-महायुतीकडून पंकजा मुंडे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष-मविआचे उमेदवार बजरंग सोनवणे तसेच वंचित बहुजन आघाडीकडून अशोक हिंगे निवडणूकीला सामोरे गेले. ‘वंचित’चे उमेदवार अशोक हिंगे यांच्यासाठी पक्षाचे अध्यक्ष अ‍ॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी बीड जिल्ह्यात सभा घेतल्या. पंकजा मुंडेंसाठी स्वत: पंतप्रधान नरेंद मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, छत्रपती उदयनराजे भोसले, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री धनंजय मुंडे, स्वत: पंकजा मुंडे यांनी सभा घेत मतदारांना आवाहन केले. दुसरीकडे बजरंग सोनवणे यांची प्रचार यंत्रणा हाताळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ.संदीप क्षीरसागर, माजी आ.सय्यद सलीम, माजी मंत्री प्रा.सुरेश नवले, माजी मंत्री बदामराव पंडीत तसेच काँग्रेस,शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकारी यांनी पुढाकार घेतला. बीडमध्ये आणि अंबाजोगाईत स्वत: शरद पवार यांनी बजरंग सोनवणेंसाठी सभा घेतली.

 

सोमवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली. गत 2019 च्या निवडणूकीच्या तुलनेत 4.8 टक्के यावेळी वाढले असल्याचे अंतिम मतदानाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. वाढलेला टक्का कोणत्या उमेदवारासाठी फायद्याचा ठरणार, आणि कोणासाठी तोट्याचा याचे उत्तर 4 जूनला मिळणार आहे. मात्र एक निश्चित की, महायुती असो की,महाविकास आघाडी; या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी निवडणूकीत मतदारांना केलेले आवाहन मतदारांनी स्वीकारले की धुडकावले? हे ही मतमोजणीनंतर कळणार आहे. म्हणूनच नेते आता तरी आपणच विजयी होणार असे सांगत असले तरी त्यांची खरी कसोटी आता सुरु झाली आहे. तोपर्यंत सर्वांनाच वेट अ‍ॅन्ड वॉच करावे लागणार आहे.

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.