कपीलधार तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी उर्वरित 89 कोटींसह अधिकचा निधी लागला
तरी डिसेंबरच्या अधिवेशनात पुरवणी मागण्यांत मंजूर करणार: मुंडे
बीड । वार्ताहर
श्री क्षेत्र कपीलधार तिर्थक्षेत्राच्या 100 कोटींच्या विकास आराखड्याला सन 2017 मध्येच मान्यता मिळालेली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी हा आराखडा मंजूर केला. यात पहिल्या टप्प्यातील 11 कोटी निधी मिळाला आहे. आता या आरखड्याच्या दुसर्या टप्प्यातील उर्वरित 89 कोटींच्या निधीसह जास्तीचा निधी लागला तरी येत्या डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये सुधारित आराखडा मंजूर करु अशी ग्वाही राज्याचे कृषी मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी कपिलधार येथे रविवारी (दि.26) शिवा संघटनेच्या मेळाव्यात दिली.तसेच माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांनी त्यांच्या भाषणात मनोहर धोंडे 28 वर्षांपासून काम करत आहेत. ते मुळचे शिवसैनिक आहेत. मात्र अद्याप त्यांना राजकीय प्रतिष्ठा मिळाली नाही. ते विधानसभेत दिसावेत समाजाने त्यांच्या पाठीशी उभे रहावे असे सांगितले. हा धागा पकडून धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात दोन्ही प्राध्यापक विधानसभा किंवा विधानपरिषदेत दिसावेत हीच या ठिकाणी माझी प्रार्थना असल्याचे सांगितले.
वीरशैव लिंगायत समाजाचे दैवत संत मन्मथस्वामी यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने कार्तिकी पौर्णिमेला कपीलधारमध्ये यात्रा भरते. रविवारी प्रा.मनोहर धोंडे यांच्या शिवा संघटनेचा मेळावा इथे पार पडला. यावेळी धनंजय मुंडे बोलत होते. व्यासपीठावर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, संघटनेचे अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे, माजी मंत्री सुरेश नवले, माजी जिल्हाप्रमुख अॅड.चंदकांत नवले, शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मुळूक, चंद्रशेखर शिवाचार्य महाराज अहमदपूरकर, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.
संत बसवेश्वर, संत मन्मथस्वामी आणि राष्ट्रसंत शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या प्रतिमांचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक प्रा. मनोहर धोंडे यांनी केले. 28 वर्षांपासून आपण हा मेळावा घेत असून समाजाच्या न्याय हक्कांसाठी काम करत असल्याचे सांगितले. अहमदपूर येथील भक्तीस्थळाला 25 कोटी आणि कपीलधारच्या 100 कोटींच्या आराखड्यातील दुसर्या टप्प्याचा निधी मिळावा अशी मागणी त्यांनी केली. यावेळी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, संत मन्मथस्वामी यांच्या पदस्पर्शाने बीड जिल्हा पुनीत झाला आहे. 22 वर्षांपूर्वी इथे शासकीय महापुजा व्हावी या मागणीचा मी साक्षीदार आहे. संघटना आणि गोपीनाथराव मुंडे यांच्या विनंतीवरुन तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी इथे शासकीय महापुजा सुरु केली. मी परळीचा आहे. वैद्यनाथाच्या सेवेकरी आहे. त्यामुळे शिवाराधना ही माझ्या रक्तात आहे. श्री क्षेत्र कपिलधार आणि परळीचे प्रभु वैद्यनाथ यांचे नाते अतुट आहे. आज जरी पालकमंत्री असलो तरी लहानपणापासूनच मी मन्मथस्वामी महाराजांच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी इथे आलेलो आहे असे सांगत मुंडे म्हणाले, संत मन्मथ स्वामी महाराष्ट्रावरील सर्व संकटे दूर करो, हीच प्रार्थना मी केली, राज्यातील शेतकरी संकटात आहेत त्यांचे संकट मलाही दिसते, ते संकटही दूर व्हावे असे साकडे मी मन्मथस्वामींच्या चरणी घातल्याचे मुंडे म्हणाले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात स्मारकासाठी निधी दिला गेला. महात्मा बसवेश्वरांच्या नावे महामंडळ करुन 50 कोटी निधी दिला गेला. हा निधी वाढवा, कपीलधाराचा वाढीव निधी मिळावा यासाठी हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांत तरतूद करण्याचा प्रयत्न करु. अहमदपूर भक्तीस्थळालाही 25 कोटी निधी देण्यासाठी केसरकर आणि मी पाठपुरावा करु. अधिवेशनाच्या आधी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, संघटना आणि शिवाचार्य यांची बैठक घ्यावी आणि विरशैव समाजाचे सर्व प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करु असेही मुंडे म्हणाले. यावेळी प्रा. सुरेश नवले, मंगेश चिवटे यांची समायोजित भाषणे झाली. मेळाव्याला हजारो नागरिक उपस्थित होते.
दोन्ही प्राध्यापक सभागृहात हवेत हीच प्रार्थना
माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांनी त्यांच्या भाषणात मनोहर धोंडे 28 वर्षांपासून काम करत आहेत. ते मुळचे शिवसैनिक आहेत. मात्र अद्याप त्यांना राजकीय प्रतिष्ठा मिळाली नाही. ते विधानसभेत दिसावेत समाजाने त्यांच्या पाठीशी उभे रहावे असे सांगितले. हा धागा पकडून धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात दोन्ही प्राध्यापक विधानसभा किंवा विधानपरिषदेत दिसावेत हीच या ठिकाणी माझी प्रार्थना असल्याचे सांगितले. दरम्यान मंगेश चिवटे यांनी मुख्यमंत्री आज आले नसले तरी पुढील वर्षीही शिंदे हेच मुख्यमंत्री म्हणून यावेत असे साकडे आपण घातल्याचे सांगितले.
चंद्रशेखर शिवाचार्य यांना युवा संत पदवी
मेळाव्यात शिवा संघटनेच्या वतीने अहमदपूर मठाचे उत्तराधिकारी चंद्रशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना युवा संत ही पदवी मान्यवर मंत्री महोदयांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. केवळ 14 वर्षांचे असलेल्या या शिवाचार्यांनी 5 भाषेत अध्यात्मिक शिक्षण घेतले आहे. यावेळी मन्मथ माऊलीच्या जयघोषाने परिसर दुमदूमुन गेला होता.
पावसाची हजेरी
मेळाव्याच्या सुरुवातीला वरुणराजाने सुमारे 10 ते 15 मिनिटे हजेरी लावली. हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. यात्रेसाठी महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक राज्यातून भाविक मोठ्या संख्येने आल्याने संपर्ण डोंगर परिसर गर्दीने फुलून गेला होता. मेळाव्याच्या सुरुवातीला गायलेल्या गितांनी वातावरणात उत्साह संचारला होता.
Leave a comment