बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मोदी – शहा फडणवीस यांनी मुख्यमंत्री केले !

मुंबई । वार्ताहर

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असे सारे राजकीय चित्र दिवसभर रंगवले जात असतानाच आता महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक अनपेक्षित घडामोड पहावयास मिळाली. स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हेच आता महाराष्ट्राचेे मुख्यमंत्री होतील,आणि त्यांना भाजप पाठिंबा देईल,शिवाय या राज्य सरकारला माझे समर्थन असेल अशी मोठी आणि सार्‍याच राजकीय पक्षांना अनपेक्षित मोठा धक्का देणारी घोषणा केली. दरम्यान फडणवीस यांनी दाखवलेल्या मोठ्या मनाचे एकनाथ शिंदे यांनी स्वागत करत आभार मानले. ही राजकीय घटना ऐतिहासीक असल्याचेही शिंदे याप्रसंगी सांगीतले. माझी अशी कोणतीही अपेक्षा नव्हती असेही ते म्हणाले.

आज सकाळपासून ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या. त्या सर्व राज्याने पाहिल्या. दरम्यान शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी दुपारी मुंबईत येवून देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील सागर बंगल्यात बैठक घेत चर्चा केली. या दोन्ही नेत्यांमध्येे चर्चा झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत आगामी सरकारची भूमिका विषद केली. यावेळी फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवत एकनाथ शिंदे हेच आता महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील अशी मोठी घोषणा केली.यापप्रींसंगी देवेंद्र फडणवीस म्हणाले , 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेची युती होती. या युतीच्या माध्यमातून भाजपानं 105 जागा आणि शिवसेनेने 56 जागा जिंकल्या. जवळपास 161 युती आणि अपक्ष मिळून 170 बहुमत आमच्याकडे होते. भाजपा-शिवसेना युतीचं सरकार तयार होईल. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी भाजपाचा मुख्यमंत्री बनेल अशी घोषणा केली होती. परंतु दुर्दैवाने त्या निवडणुकीचे निकाल आल्यानंतर शिवसेना आणि त्यांचे नेते यांनी वेगळा निर्णय घेतला. विशेषत: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आजन्म ज्यांचा विरोध केला अशा काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती केली आणि भाजपाला बाहेर ठेवले. हा खरेतर जनमताचा अपमान होता. जनतेचा कौल भाजपा-शिवसेनेला होता. परंतु त्याचा अपमान करून महाविकास आघाडी अस्तित्वात आली.

एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी निवड करून देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार मास्टर स्ट्रोक मारला आहे. आपण स्वतः कोणते पद स्वीकारत नाही, तर इतरांना मुख्यमंत्री बनवतो, मंत्री बनवतो, अशी महाराष्ट्रातल्या नेत्यांची घमेंड झाली होती, ती देवेंद्र फडणवीस यांनी ऍक्टिव्ह पॉलिटिक्स मध्ये राहून तोडून टाकली आहे

फडणवीसांचे नेतृत्व मुख्यमंत्री पदापेक्षा मोठे

पण या आभारापलिकडे फडणवीस यांनी आपले राजकीय नेतृत्वात सिद्ध करून दाखवले आहे. खरोखर एकनाथ शिंदे यांच्या गटाला उपमुख्यमंत्री पद आणि जास्तीची मंत्री पदे सोपवून त्यांना स्वतःला मुख्यमंत्रीपद नक्की स्वीकारता आले असते. मी पुन्हा येईल ही जिद्द पूर्ण करता आली असती. ते फारसे अवघड नव्हते. पण भारतीय जनता पार्टीच्या काही विशिष्ट धोरणांनी आणि विशिष्ट राजकीय हेतूंनी फडणवीस यांनी स्वतःच्या कक्षेत आलेले मुख्यमंत्रीपद स्वतःहून एकनाथ शिंदे यांच्याकडे दिल्याचे दिसत आहे. अर्थात राजकारणात हा दुर्मिळ गुण मानला जातो.

याचा दुसराही अर्थ असा होऊ शकतो की भविष्यकाळात स्वतः देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पार्टीच्या आणि केंद्र सरकारच्या राजकारणात मोठे पद भूषवू शकतात. त्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापेक्षा मोठे पद भाजप मधून दिले जाऊ शकते. देवेंद्र फडणवीस यांनी वयाच्या 52 व्या वर्षी आपल्याला आपल्या स्वतःला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापेक्षाही वरच्या पदावर नेऊन ठेवले आहे. मराठी माध्यमांनी महाराष्ट्राचे चाणक्य मानले गेलेल्या आणि तेल लावलेला मल्ल असे बिरूद लावलेल्या महानेत्यालाही फडणवीस यांचीही राजकीय किमया साधता आलेली नाही. उलट महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना एकनाथ शिंदे यांना बाजूला सारून दस्तुरखुद्द ठाकरे घराण्यातील प्रमुखाला मुख्यमंत्री नेमावे लागले आणि अडीच वर्षात त्या मुख्यमंत्र्याला पायउतार करावे लागले. हा राजकीय विक्रम देखील ठाकरे घराण्याच्या नावावर पहावा लागला आहे.

तसेच गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची नवीन विकास योजना नाही. भ्रष्टाचारात 2 मंत्री जेलमध्ये जाणे. एकीकडे मा.बाळासाहेब ठाकरेंनी सातत्याने देशाचा शत्रू असलेल्या दाऊदचा विरोध केला. दुसरीकडे त्याच्याशी संबंध ठेवलेल्या मंत्र्यांला पाठिशी घातले. दररोज सावरकरांचा अपमान, हिंदुत्वाचा तिरस्कार झाला. जोपर्यंत विश्वासदर्शक ठराव समंत केल्याशिवाय कॅबिनेट घेता येत नाही. ते प्रस्ताव मंजूर केले. ते वैध मानले जाणार नाहीत. पुढच्या कॅबिनेटमध्ये आम्हाला तो निर्णय घ्यावाच लागणार आहे असंही फडणवीसांनी सांगितले.  
दररोज अपमान होत असेल तर कशाच्या भरवशावर आम्ही लढायचं. ज्यांना आपण हरवलं त्यांना निधी देण्याचं काम केले जात होते. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तोडा, आम्ही त्यांच्यासोबत राहायला तयार नाही अशी भूमिका शिवसेना आमदारांनी घेतली. परंतु दुर्देवाने उद्धव ठाकरेंनी आमदारांपेक्षा काँग्रेस-राष्ट्रवादीला शेवटपर्यंत धरून ठेवले. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. परंतु उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर पर्यायी सरकार देणे गरजेचे होते. सरकार पडलं तर आम्ही पर्यायी सरकार देऊ असं वारंवार आम्ही सांगत होतो. लोकांवर निवडणुका लादणार नाही. भाजपा-शिंदे गटाचे आमदार आणि 16 अपक्ष, घटक पक्षांचे आमदार आमच्यासोबत आले आहेत. आणखी काही आमदार आमच्यासोबत येत आहे. आम्ही सत्तेच्या पाठिशी नाही. कुठल्यातरी मुख्यमंत्रिपदासाठी आम्ही काम करत नाही. ही तत्वाची, हिंदुत्वाची आणि विचारांची लढाई आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना भाजपा समर्थन देईल अशी घोषणाही फडणवीस यांनी केले. त्यांच्या या घोषणेचे एकनाथ शिंदेंनी स्वागत करत फडणवीस यांचे आभार मानले.

बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मोदी – शहा फडणवीस यांनी मुख्यमंत्री केले!!

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि देवेंद्र फडणवीस, त्यांच्या बाकीच्या सहकाऱ्यांनी बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपद मुख्यमंत्री करून दाखवले आहे. आम्ही कोणत्याही पदासाठी कधीच संघर्ष केला नव्हता. आमचा वैचारिक विरोध काँग्रेस-राष्ट्रवादीला होता आणि तो यापुढेही कायम राहील.

शिवसेनेतले आणखी आमदार बरोबर येतील. बाकी अपक्षही बरोबर येतील, असा विश्वास नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. आज त्यांच्या एकट्याचाच राजभवनात सायंकाळी साडेसात वाजता शपथविधी होणार आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.