बीड | वार्ताहर
अवैध गर्भपात केल्यानेच महिलेचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालावरून स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी मयत महिलेच्या पतीसह नातेवाईकास ताब्यात घेत चौकशी सुरू केली.त्यानंतर मिळालेल्या महितीनंतर तपासचक्रे गतिमान करत बीड पोलिसांनी आज मंगळवारी दुपारी गेवराई शहरातून एका डॉक्टर महिलेस चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.दरम्यान या प्रकरणात आणखी किती जणांचा सहभाग आहे, गर्भपात कोठे झाला आणि काढलेला गर्भाची कोठे विल्हेवाट लावली, याचाही आता बीड पोलीस शोध घेत असून सर्व बाजुंनी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
सीताबाई उर्फ शीतल गणेश गाडे (३०, रा. बक्करवाडी, ता. बीड) असे मयत महिलेचे नाव आहे. शीतल या ऊसतोड मजूर असून, त्यांना तीन मुली आहेत. त्या चौथ्यांदा गर्भवती होत्या. परंतु, 5 जून रोजी अचानक त्यांना रक्तस्त्राव सुरू झाल्याने पहिल्यांदा खासगी आणि तेथून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिथे येण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. यात संशय आल्याने पाच डॉक्टरांच्या समितीकडून शवविच्छेदन करण्यात आले होते. त्यानंतर अवैध गर्भपात असल्याचे स्पष्ट झाले होते.
आज मंगळवारी सकाळी या प्रकरणात पोलिसांनी मयत महिलेच्या पतीसह नातेवाइकांना पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून घेत चौकशी केली. त्यांनी याची कबुली दिली. त्यानंतर त्या सर्वांना घेऊन पोलिस ज्यांनी गर्भपात केला, अशा ठिकाणी पोहचले. गेवराई तालुक्यातील एका महिला डॉक्टरला पोलिसांनी दुपारी २.३० वाजता ताब्यात घेतले आहे. या गर्भपात प्रकरणामुळे बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा स्त्री भ्रूण हत्येचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे.प्रशासन आता या प्रकरणात आणखी काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
Leave a comment