उद्यापासून सर्व दुकाने, हॉटेल उघडणार
सायं.5 वाजेपर्यंत जमावबंदी, त्यानंतर संचारबंदी
शनिवार,रविवार वगळता दररोज सकाळी सात ते चार वाजेपर्यंत व्यवहार सुरु
बीड । वार्ताहर
कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येवू लागल्यानंतर आता बीड जिल्ह्यातही निर्बंध शिथिल करण्यास जिल्हा प्रशासनाकडून सुुरुवात झाली आहे. राज्य सरकारच्या अनलॉकच्या प्रक्रियेत बीड जिल्हा तिसर्या गटात येत असल्याने आता बीड जिल्ह्यात उद्यापासून (दि.7) हॉटेल, सलूनसह सर्व दुकाने उघडता येणार आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत यात व्यवहार करता येणार आहे. यातील अत्यावश्यक सेवेतील दुकाने आठवड्याचे सर्व दिवस तर इतर दुकाने शनिवार रविवार वगळता इतर 5 दिवस उघडता येणार आहेत. तसेच आता बीड जिल्ह्यातून आंतरजिल्हा प्रवसासाठी ई-पासची देखील गरज पडणार नाही. मात्र सायं.5 वाजेपर्यंत जमावबंदी, त्यानंतर संचारबंदी असणार आहे.
दिड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर बीड जिल्ह्यातील बाजारपेठ पुन्हा एकदा सुरु होत आहे.निर्बंध शिथिल करण्यासंदर्भातील आदेश रविवारी पहाटे बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जारी केले आहेत.राज्य शासनाने राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यानुसार आता 5 गटात वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळे निर्बंध हटविण्यात येणार आहेत. बीड जिल्हयाचा समावेश तिसर्या गटात आहे. याठिकाणी अत्यावशक आणि इतर सर्व व्यवहार आता सुरु करता येणार आहेत. फक्त त्यासाठी वेळेचे मर्यादा घालून देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील व्यवसायांसह इतर सर्व व्यवसाय सकाळी 7 ते दुपारी 4 या वेळेत सुरु ठेवता येणार आहेत. अत्यावश्यक व्यवसाय रोज तर इतर व्यवसाय शनिवार,रविवार वगळता आठवड्यातील 5 दिवस सुरु राहतील. तर हॉटेल 50 टक्के क्षमतेने आठवड्यातील 5 दिवस सुरु करता येणार आहेत. दुपारी 4 नंतर हॉटेलला पार्सल सेवा देता येईल. सलून देखील दुपारी 4 वाजेपर्यंत आणि 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवता येतील. ज्या ठिकाणी साईटवर मजुरांच्या राहण्याची सोय आहे अशी बांधकामे देखील सुरु करता येतील. क्रीडांगण , मैदाने, पार्क सकाळी 9 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत, तर चित्रपटगृहे आणि मॉल मात्र बंदच राहणार आहेत.सार्वजनिक आणि खाजगी वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरु राहणार असून खाजगी वाहतुकीसाठी पासची आवश्यकता राहणार नाही. असे असले तरी जिल्हाधिकारी यांच्या या आदेशानुसार,बीड जिल्ह्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत जमावबंदी आदेश लागू असतील, तर त्यानंतर सायंकाळी 5 ते सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असेल असे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जारी केलेल्या आदेशात नमुद केले आहे.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment