प्राणवायू मुबलक; रेमडेसिवीरचेही नियोजन

घाबरु नका, प्रशासन तुमच्या पाठीशी

बीड । वार्ताहर

गेल्या आठवड्यातच ऑक्सीसजअभावी रुग्णांचा मृत्यू होतो की काय? अशी परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झालेली असतानाच रेमडेसिवीरचा मोठ्या प्रमाणात झालेला तुटवडा आणि सातत्याने होणारी रुग्णवाढ यामुळे विदारक परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातच समाजात परिचित असणारी काही मंडळी कोरोनाने हिरावल्याने जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र, प्रशासन कामाला लागल्यावर काय होते, याची चूणूक जिल्हाधिकारी रवींद्र जगताप आणि त्यांच्या टिमने दाखवून दिली आहे. जिल्ह्यात विद्यमान स्थितीत बीड जिल्हा रुग्णालयासह स्वाराती, लोखंडी सावरगाव, सर्व ग्रामीण रुग्णालये आणि जवळपास सर्वच खासगी रुग्णालयांमध्ये आवश्यक तो तेवढा ऑक्सीजनचा साठा असून कोरोना रुग्णांना वरदान ठरणारा प्राणवायू जिल्ह्यात मुबलक असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिली.

गेल्या तीन-चार दिवसात रेमडेसिवीरचेही प्रशासनाने नियोजन लावले असून गेल्या दोन दिवसामध्ये रेमडेसिवीरबद्दल होणारी ओरड नक्कीच कमी झाली आहे. अजुनही काही रुग्णांना रेमडेसिवीर आवश्यक आहे. जिल्हा रुग्णालयासाठी देण्यात येणार्‍या रेमडेसिवीरमधून काही इंजेक्शन नियमबाह्यपणे वापरली जात असल्याची तक्रार जिल्हाधिकार्‍यांकडे आल्यानंतर त्यातही त्यांनी लक्ष घातले. स्थानिक स्वराज्यचे आ.सुरेश धस यांच्या तक्रारीनंतर औषध निरीक्षक रामेश्वर डोईफोडे यांच्याकडील कारभार उपजिल्हाधिकारी प्रविण धरमकर यांच्याकडे दिला गेला. त्यानंतर सर्वांनाच उशिरा का होईना इंजेक्शन मिळू लागले. 

ऑक्सीजन निर्मितीसाठी सध्या बीडमध्ये 1 आणि अंबाजोगाईत 2 असे तीन प्रकल्प कार्यान्वीत असून यातून जवळपास 24 ते 25 लाख लिटर प्रतिदिन ऑक्सीजन तयार केला जात आहे. तसेच बीड औद्योगिक वसाहतीत असलेल्या खासगी प्रकल्पांमधूनही ऑक्सीजन सिलेंडर घेतले जात आहेत. जिल्ह्यामध्ये सध्या 1956 रुग्ण ऑक्सीज बेडवर आहेत. या रुग्णांना 10 लिटरपेक्षा जास्त प्रतिदिन ऑक्सीजन लागत आहे. ऑक्सीजनचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी त्याचे लेखापरिक्षण अर्थात ऑडिटही केले जात आहे. यापूर्वी आरोग्य प्रशासनाकडेच ऑक्सीजनचे नियोजन होते. मात्र ते नियोजन देखील महसूल प्रशासनाने हाती घेतले आहे. काही दिवसांपूर्वी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी तशा सूचनाच महसूल प्रशासनाला दिल्या होत्या. जिल्हा रुग्णालयासह लोखंडी सावरगाव आणि स्वाराती रुग्णालयात तसेच काही खासगी रुग्णालयात देखील वापरण्याच्या पध्दतीमुळे आणि इतर काही तांत्रिक कारणांमुळे ऑक्सीजन मोठ्या प्रमाणात वाया जात होता, नाशिकची घटना घडल्यानंतर महसूल आणि आरोग्य प्रशासन खडबडून जागे झाले. बीडच्या ऑक्सीजन प्लान्टची पाहणी करण्यात येवून ऑक्सीजनचा अपव्यय टाळून त्याची बचत करण्यावर भर दिला गेला. रुग्ण बेडवरुन उठला, की ऑक्सीजन बंद करण्याची सवय कर्मचार्‍यांना लावण्यामुळे मोठ्या प्रमाणात ऑक्सीजनची बचत झाली आहे.एकंदरीच जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी गोंधळलेल्या प्रशासनाला काहीशी शिस्त लावण्याचा प्रयत्न केला असून त्याचा फायदा रुग्णांना होवू लागला आहे. विद्यमान परिस्थितीत ऑक्सीजनचा साठा मोठ्या प्रमाणात असून रेमडेसिवीरचाही तुटवडा काही दिवसात संपेल असा विश्वास जिल्हाधिकारी जगताप यांनी व्यक्त केला आहे.

11 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प कार्यान्वीत करणार

जिल्हा रुग्णालय 2, स्वराती रुग्णालय 2, लोखंडी सावरगाव रुग्णालय 2 आणि परळी, केज, आष्टी, गेवराई , माजलगाव येथील उपजिल्हा रुग्णालय प्रत्येकी 1 असे 11 प्रकल्प उभारले जाणार आहेत . यातील . या प्रकल्पांना मंजुरी दिल्यानंतर विनाविलंब कार्यारंभ आदेश देखील देण्यात आले आहेत.दिवसाकाठी 175 जम्बो सिलेंडर इतक्या ऑक्सिजन निर्मितीची प्रत्येक प्रकल्पाची क्षमता असणार आहे. सामान्य रुग्णाला एक जम्बो सिलेंडर एक दिवस पुरु शकते, त्यामुळे ऑक्सिजन मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी व्यक्त केला.

अविनाश पाठक चाकणमध्ये

जिल्ह्याला आणि मराठवाड्याला चाकण येथील रेल्वे स्थानकावरुन ऑक्सीजनचे टँकर पाठवले जात आहेत. औरंगाबाद येथील उपायुक्त अविनाश पाठक हे स्वत: चाकण येथे बसून आहेत. ऑक्सीजनचा टँकर मध्ये कोणीही अडवू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सहाय्यक निरीक्षक अमोल गुरले यांच्यावरही जबाबदारी दिली आहे. ऑक्सीजन टँकरसोबत त्यांना तैनात करण्यात आले असून शुक्रवारी टँकर चाकण येथे रवाना झाला. स्वत: जिल्हाधिकारी जगताप हे या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तर जिल्ह्यामध्ये ऑक्सीजनचा पुरवठा कमी पडू नये आणि नियमितपणे ऑक्सीजन मिळावा यासाठी आरोग्य अधिकार्‍यावर जबाबदारी असते, मात्र ही जबाबदारी जिल्हाधिकारी जगताप यांनी उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर यांच्यावर सोपवली आहे. ते देखील ऑक्सीजनच्या पुरवठ्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहेत.

आरोग्य प्रशासन कार्यक्षम नाही

महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या तुलनेत आरोग्य प्रशासनात चालढकलपणा नित्याचाच असतो. रुग्ण गंभीर आजारी असला तरी त्याकडे नेहमीप्रमाणे पाहून उपचार करण्याची सवय वैद्यकीय अधिकार्‍यांपासून तर वार्डबॉयपर्यंत या सार्‍याना असते. रोजचे मडे त्याला कोण रडे या पध्दतीने आरोग्य प्रशासनातील अधिकारी काम करत असतात.परंतु या आपत्तीमध्ये ज्या कार्यक्षमतेने आरोग्य प्रशासनाने काम करायला हवे, त्या कार्यक्षमतेने काम करायला हवे. केवळ खाऊ वृत्ती अंगिकारलेले अधिकारी असल्याने आरोग्य प्रशासन पुरते बदनाम झाले आहे. त्यामुळे अशा अकार्यक्षम प्रशासनावर अवलंबून न राहता महसूल प्रशासनाने यंत्रणा ताब्यात घेतल्याने अनेकांचे जीव वाचले आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.